Tue, Apr 23, 2019 13:54होमपेज › Aurangabad › बोगस कर्मचार्‍याची सक्‍तमजुरी कायम

बोगस कर्मचार्‍याची सक्‍तमजुरी कायम

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 1:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बनावट कागदपत्रे तयार करून चक्‍क दुसर्‍याच्या नावावर तब्बल दहा वर्षे सरकारी नोकरी करणार्‍या आणि सरकारी नोकरीचे सर्व फायदे उचलून संबंधित व्यक्‍तीसह शासनाची फसवणूक करणार्‍या आरोपीला दोन वर्षे सक्‍तमजुरी व 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ठोठावली होती. या शिक्षेला आरोपीने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी आरोपीचे अपील फेटाळत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.

या प्रकरणी शंकर श्यामा राठोड (47, रा. खेर्डी तांडा, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या नावाचे विविध बनावट दस्तावेज तयार करून आरोपी शंकर देवा जाधव (44, रा. खेर्डी तांडा, ता. पैठण) याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेंतर्गत 13 सप्टेंबर 1991 ते 8 एप्रिल 2001 या कालावधीत विविध आश्रमशाळांमध्ये शिपाई पदावर नोकरी केली व सरकारी नोकरीचे सर्व लाभ घेतले. मुलाखतीसह नोकरीची सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरही नोकरीसंदर्भात काहीही कळविण्यात आले नाही म्हणून फिर्यादीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले होते. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून आरोपीला 2 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी  23 ऑक्टोबर 2008 रोजी ठोठावली होती. त्याविरुद्ध आरोपीने जिल्हा न्यायालयात  अपील दाखल केले होते.  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा योग्य असून, आरोपीचे अपील फेटाळण्यात यावे, अशी विनंती सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.