Sun, Apr 21, 2019 04:40होमपेज › Aurangabad › १० लाखांच्या लाचप्रकरणात 'वाल्मी'चे महासंचालक, उपसंचालक जाळ्यात

लाचप्रकरणी ‘वाल्मी’चा महासंचालक जाळ्यात

Published On: Dec 29 2017 9:57PM | Last Updated: Dec 30 2017 12:59AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

‘तुमची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झाली असून नियुक्‍तीच्या वेळी तुम्ही दिलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची व अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे’ असे सांगून, हे प्रकरण पुढे न नेता मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी तब्बल दहा लाखांची लाच घेताना वाल्मीचा महासंचालक आणि अधीक्षक अभियंता तथा सहसंचालकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी (दि. 29) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सहसंचालकाच्या कक्षात ही कारवाई केली. 2017 मधील औरंगाबाद एसीबीचा हा सर्वांत मोठा ट्रॅप ठरला. 

महासंचालक हरिभाऊ कांचन गोसावी (56, रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक, ह.मु. वाल्मी शासकीय निवासस्थान) आणि उपसंचालक राजेंद्र बाबूराव क्षीरसागर (55, रा. मधुवंती टी-502, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे, ह.मु. वाल्मी शासकीय निवासस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. महासंचालक हरिभाऊ गोसावी हा सचिव दर्जाचा अधिकारी असून मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. त्यामुळे आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण रोडवर कांचनवाडीत जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) मुख्य कार्यालय आहे. मराठवाड्यातील जलसंधारणाची कामे करणारे हे मुख्य कार्यालय आहे. महासंचालक हरिभाऊ गोसावी हा येथील प्रमुख आहे. तक्रारदार डॉ. पवार विज्ञान शाखेचे प्रमुख आहेत. गोसावी आणि क्षीरसागर यांनी पवार यांना ‘तुमची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झालेली असून तुम्ही नेमणुकीच्या वेळी दिलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची व अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांना पत्र दिले व कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, काही दिवसांनी दहा लाख रुपयांची लाच मागून पैसे द्या नाही तर प्रकरण पुढे नऊ, अशी धमकी दिली. याशिवाय ज्या संस्थेने नियुक्‍ती केली ती रद्द करू, असे सांगितले. 

मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे पवार यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यांची एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर 29 डिसेंबर रोजी एसीबीचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, बाळा कुंभार, निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस नाईक हरिभाऊ कुर्‍हे, गोपाल बरंडवाल, संदीप आव्हाळे, शिपाई अश्‍वलिंग होनराव, अरुण उगले, बाळासाहेब राठोड, दिलीपसिंग राजपूत यांच्या पथकाने सापळा रचला. त्यात हरिभाऊ गोसावी आणि राजेंद्र क्षीरसागर अडकले.

एक लाखाच्या खर्‍या, नऊ लाखांच्या डमी नोटा

महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि उपसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांनी तब्बल दहा लाखांची मागणी केली होती. एसीबीला ट्रॅप यशस्वी करण्यासाठी एवढी रक्‍कम जुळविणे शक्य नव्हते. तसेच, तक्रारदाराकडेही दहा लाखांची रक्‍कम नव्हती. त्यामुळे एक लाखाच्या खर्‍या नोटा आणि नऊ लाख रुपयांच्या डमी नोटा (नोटांच्या आकाराचे कागदाचे बंडल) तयार करून एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

पुणे, सोलापूर, नाशकात घरझडती

कांचनवाडीतील वाल्मीच्या कार्यालयात सापळा यशस्वी होताच औरंगाबाद एसीबीने आरोपी हरिभाऊ गोसावी आणि राजेंद्र क्षीरसागर यांच्या घरांची माहिती मिळविली. त्यानुसार, त्यांची पुणे, सोलापूर आणि नाशकात घरे असल्याचे समोर आले. त्यावर संबंधित एसीबीच्या अधिकार्‍यांना माहिती देऊन घरझडती घेण्याचे सांगण्यात आले. मात्र, गोसावी याच्या नाशकातील घराला कुलूप होते.