Sun, Jul 21, 2019 01:57होमपेज › Aurangabad › तलाठी कृपेने ‘अख्खे गाव’ दोन हेक्टर जमीनीचे मालक

जमीन दोन हेक्टर, मालक ‘समस्त गावकरी’

Published On: Jun 30 2018 9:01AM | Last Updated: Jun 30 2018 9:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जे नसे ललाटी.. ते लिही तलाठी... या म्हणीचा प्रत्यय उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आला आहे. तत्कालीन तलाठ्याच्या एका नोंदीमुळे आज उपविभागीय अधिकार्‍यांना (एसडीएम) दिवसाही तारे दिसले.मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात भूसंपादन सुरू असून, वरूड काजी येथील दोन हेक्टर जमिनीचा मोबदला मागण्यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वरूड काजी गावातील सुमारे अडीचशे ग्रामस्थ धडकले. दोन हेक्टरचा मोबदला या ग्रामस्थांना तब्बल तीन कोटी रुपये मिळणार आहे, हे विशेष.

गेल्यावर्षी जून महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी समृद्धी महामार्गासाठी संपादित होणार्‍या गावांतील जमिनीचे दर जाहीर केले होते. त्यानंतर जिल्ह्यात भूसंपादन सुरू झाले. आतापर्यंत एकूण मागणीच्या सुमारे 70-75 टक्के जमीन संपादित केली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वरूड काझीतील अडीचशे शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले. जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांची मासिक बैठक असल्याने एसडीएम, तहसीलदार असे सर्व अधिकारी बैठकीला होते.

शेतकर्‍यांचा जमाव आल्याचे कळाल्यानंतर एसडीएम ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार सतीश सोनी हे बैठकीतून एसडीएम कार्यालयात आले. त्यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. तब्बल तास-दीड तासानंतर शेतकर्‍यांनी कार्यालय सोडले. हा विषय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह वरूड काजी गावात चर्चेचा ठरला होता. हा महामार्ग येथून गेल्या या गावाचा विकास होणार आहे.

सातबारा ठरला महत्त्वाचा
1955-60 दरम्यान एका मुस्लिम समाजाच्या महिलेकडून 225 जणांनी सुमारे 100 हेक्टर जमीन खरेदी केलेली आहे. ही जमीन डोंगराळ, माळरान आहे. रजिस्ट्रीवर 225 जणांची नावे आहेत, त्यामुळे तत्कालीन तलाठ्याने सर्व नावे न घेता ‘समस्त गावकरी’ अशी नोंद सातबार्‍यावर केलेली आहे. या गटातील 2 हेक्टर जमीन संपादित होणार असून, गावातील जमिनीला एकरी 60 लाखांचा भाव जाहीर आहे. सुमारे 3 कोटी मोबदला द्यावा लागणार आहे. हा मोबदला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

काय आहे प्रकरण

वरूड काजी गावातील गट नंबर 60 व 71 मध्ये सुमारे 100 हेक्टर जमीन आहे. 1958 मध्ये समस्त गावकर्‍यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे. 26 जानेवारी 2018 रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन  संपादनापोटी मिळणारा मोबदला मिळवण्याबाबत एकमत झाले. तेव्हापासून ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन एसडीएम शशिकांत हदगल यांच्याकडेही ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यांची बदली झाल्याने, नवीन आलेल्या एसडीएम ज्ञानोबा बाणापुरे यांना भेटून मोबदला देण्याची मागणी केली. त्यांनी विधिज्ञांचा सल्ला व प्रकरण समजून घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि.29) सर्व ग्रामस्थ एसडीएम कार्यालयात आले होते, अशी माहिती सरपंच संजय दांडगे यांनी दिली.