Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Aurangabad › वैजापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने केला पंचनामा, 

उपअभियंत्यांसह १५ कर्मचारी  गैरहजर 

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:13AM

बुकमार्क करा
वैजापूर : प्रतिनिधी

शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयास तहसील कार्यालयाच्या पथकाने भेट दिली असता उपअभियंता पी. बी. पवार यांच्यासह  शाखा अभियंता व अन्य कर्मचारी असे 17 पैकी  एकूण 15 जण  गैरहजर आढळून आले. मुख्यालय दिनीच अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयास दांडी मारल्याने या दांडीबहाद्दरांचा तहसील प्रशासनाने पंचनामा केला आहे.

सोमवार हा मुख्यालय दिन असल्याने कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांची शहरातील विविध शासकीय कार्यालयात मोठी गर्दी असते, परंतु शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यालयांचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. केवळ तात्पुरते पंचनामे होतात. त्याचे पुढे काय होते हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु कोणाविरुद्ध ठोस कारवाई झाली हे आतापर्यंत निदर्शनास आले नाही.

सोमवारी मुख्यालयदिनी शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने काही नागरिकांनी तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार मंडळाधिकारी प्रल्हाद लोखंडे व दोन जणांच्या पथकाने बांधकाम उपविभागास भेट दिली असता कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एम. आर.पोंदे  व कनिष्ठ  लिपिक डी.आर.मोरे असे दोघेच उपस्थित होते. या प्रकरणी तहसीलच्या पथकाने पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसीलदार मोरे यांच्याकडे सादर केला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला दांड्या मारण्यात तरबेज झालेले आहे.

अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावलेले आहे. याचा फटका मात्र तालुक्यातील सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. कार्यालय प्रमुखच दांड्या मारीत असल्याने इतर अधिकारी व कर्मचारीही आपली वेळेनुसार कार्यालयात हजेरीपुरते दाखल होतात. शहरात शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. 

सोमवार मुख्यालय दिवस असतानाही शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता कार्यालयात गैरहजर असल्याची तक्रार तहसील कार्यालयात केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या पथकाने कार्यालयास भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. तहसीलच्या पथकाने बांधकाम उपविभागात जाऊन हजेरी पत्रकाची पाहणी केली असता उपअभियंता पी. बी. पवार यांच्यासह शाखा अभियंता व अन्य कर्मचारी असे एकूण 15 जण गैरहजर आढळून आले.

बांधकाम विभागाच्या एकूण 17 जणांपैकी 15 जण मुख्यालयदिनी दांड्या मारतात. यावरून आठवड्यातील अन्य दिवशी अधिकारी व कर्मचारी खरोखरच हजर राहून कामकाज करीत असतील का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बांधकाम विभागाचा कारभार गेल्या कित्येक वर्षांपासून अंधेर नगरी चौपट राजा या उक्तीनुसार सुरू आहे, परंतु या ढिसाळ कारभाराकडे वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, हेच यावरून दिसून येते.