होमपेज › Aurangabad › विद्यापीठासाठी रुसा अंतर्गत १२० कोटींचा निधी प्रस्तावित

विद्यापीठासाठी रुसा अंतर्गत १२० कोटींचा निधी प्रस्तावित

Published On: Dec 29 2017 1:53AM | Last Updated: Dec 29 2017 1:50AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला (बामू) उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात रुसा अंतर्गत 120 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. हा निधी तीन वर्षांसाठी असून त्यातून उभ्या राहणार्‍या संशोधन आणि नवोपक्रम केंद्रांना पुढे आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे, अशी माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र रुसा परिषदेच्या निर्देशानुसार राज्यातील विद्यापीठांनी संस्थात्मक विकास आराखडे (आयडीपी) सादर केले होते. त्यांच्या छाननीसाठी स्थापन केलेल्या उपसमितीने राज्याचा उच्च शिक्षण आराखडा व विद्यापीठांचे आराखडे आटोपशीर करण्यासाठी सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी किमान दोन व कमाल तीन संकल्पना (थीम) निश्‍चित कराव्यात. त्यापैकी एक विज्ञान/तंत्रज्ञानाशी तर दुसरी सामाजिक विज्ञानाशी संबंधित असावी. संबंधित विद्यापीठ या संकल्पनांसाठी राज्याचे एकमेव केंद्र राहील, असे या उपसमितीने सुचविले आहे. त्यानुसार बामूने सेंटर फॉर सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस प्लस अ‍ॅडव्हान्स्ड सेन्सर्स टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी फॉर कॉर्प्स आणि सेंटर फॉर वेरूळ-अजिंठा टुरिझम अशा तीन संकल्पना निश्‍चित केल्या आहेत. 

उपसमितीने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च करायचे याचे निकष ठरविले आहेत. त्यानुसार मिळणार्‍या निधीपैकी 25 टक्के म्हणजे सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी या तीन केंद्रांच्या पायाभूत सुविधांवर खर्च करावा लागणार आहे. यात अस्तित्वात असलेल्या इमारतींचे नूतनीकरण किंवा नव्या बांधकामाचा समावेश आहे. याद्वारे वसतिगृह, प्रशासकीय इमारत तसेच नव्या केंद्राची इमारत उभी केली जाऊ शकते.

संशोधन आणि नवोपक्रमासाठी एकूण निधीच्या 40 टक्के म्हणजे सुमारे 48 कोटी रुपयांची तरतूद आहे. या निधीद्वारे संशोधक सहायक, पोस्ट डॉक्टर फेलो यांची नियुक्‍ती. तद्वतच संशोधन प्रकल्पांसाठी लागणारी उपकरणे खरेदी करणे, प्रवास आदींसाठी हा पैसा खर्च करता येईल. 

शैक्षणिक सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी एकूण निधीच्या दहा टक्के म्हणजे 12 कोटी रुपये खर्च करता येतील. या निधीतून ई-बुक्स, ई-लायब्ररी, पुस्तके, वर्गखोल्यांचे आधुनिकीकरण, ग्रंथालयाचे अद्ययावतीकरण करता येईल.