Wed, May 22, 2019 22:49होमपेज › Aurangabad › अखेर... त्याने मृत्यूवर विजय मिळविला

अखेर... त्याने मृत्यूवर विजय मिळविला

Published On: Dec 04 2017 4:06PM | Last Updated: Dec 04 2017 4:06PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

घरी अठराविश्‍वे दारिद्र्य संसार भरात आला असताना, पती जग सोडून गेला. जीवनाचा आधार असलेल्या मुलासाठी काबाडकष्ट करीत पोट भरणार्‍या मातेला तेव्हा मोठा हादरा बसला जेव्हा तिच्या मुलाला जीबीएस या गंभीर आजाराने गाठले. अडीच महिन्यांपूर्वी या 12 वर्षीय बालकाची आजाराने शरीर तसेच श्‍वासोच्छवासाची यंत्रणा पॅरॉलॉईज झाली होती.

घाटीतील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा व मातेची तपश्‍चर्या यामुळे दोन महिने व्हेंटिलेटरवर राहूनही शेवटी या बालकाने मृत्यूशी झुंज जिंकली. ऋषीकेश सुसर असे या बालकाचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील आसई येथे पती वारल्यापासून मुक्‍ताबाई सुसर मुलासह राहतात.

आसई हे त्यांचे माहेर आहे. पतीची शेजारीच कोळेगाव येथे शेती फक्‍त 15 गुंठे आहे. यामुळे शेतात मोलमजुरी करून मुक्‍ताबाई संसाराचा गाडा हाकतात. अडीच महिन्यांपूर्वी ऋषीकेशला ताप आल्यानंतर औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. खर्च जास्त सांगितल्याने मुक्‍ताबाईंनी ऋषीकेशला घाटीत दाखल केले. घाटीतील डॉक्टरांनी एमआयसीयुमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले. तब्बल दोन महिने ऋषिकेश व्हेंटिलेटरवर होता. यावेळी पुष्पाबाईंना केके गु्रपच्या हाफिज साहेबांनी बाहेरून लागणारी औषधी तसेच इतर मदत पुरविली. दोन महिन्यानंतर ऋषीकेशचे व्हेंटिलेटर काढण्यात आले त्याच्या प्रकृतीत जवळपास 70 टक्के सुधारणा झाली आहे. डॉ. जिरवणकर यांच्या टीममध्ये डॉ. कैलास चितळे, डॉ. महेश जाधव, डॉ. सचिन बलखंडे, डॉ. प्रणव जांभोळकर, डॉ. शेषाद्री, डॉ. स्नेहा हे ऋषीकेशवर उपचार करीत आहेत. 


काय आहे जीबीएस आजार 

जीबीएस हा आजार तसा दुर्मीळ नाही. घाटीत या आजाराने ग्रस्त महिन्यातून किमान तीन ते चार रुग्ण येत असतात. गलेट बारी सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे. यात शरीरातील नसांवरील वेष्टन नाहीसे होऊन शरीर पॅरॉलाईज होते. विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन व उपचाराने हा  आजार बरा होतो, मात्र गंभीर अवस्थेत गेल्यानंतर रुग्ण मृत्यूमुखी पडण्याची शक्यता जास्त असते. 

ऋषीकेश सुसर या बालकाला जवळपास दोन महिने व्हेंटिलेटरवर ठेवले होते. प्रकृती अत्यंत गंभीर होती. दोन महिन्यांत त्याचे सहा वेळा रक्‍त शुद्धीकरण करण्यात आले. त्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे.  सदर बालकासाठी सर्वांनीच मदत केली. मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी  भट्टाचार्य यांचे तसेच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे मार्गदर्शन लाभले. येत्या काही दिवसांतच तो पूर्णपणे बरा होईल असे डॉ. प्रभाकर जिरवणकर यांनी सांगितले.