Wed, Mar 27, 2019 00:04होमपेज › Aurangabad › शंभर टन कचर्‍याची विल्हेवाट

शंभर टन कचर्‍याची विल्हेवाट

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMऔरंगाबाद  : प्रतिनिधी

कचरा टाकण्यास सर्वत्र विरोध होत असल्यामुळे महानगरपालिकेने आता खासदार चंद्रकांत खैरे यांची गनिमीकाव्याची सूचना अमलात आणली आहे. पालिकेने दोन दिवसांपासून गुपचूप पद्धतीने शहरातील कचरा अज्ञातस्थळी टाकणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा कचरा मनपाच्या वाहनांऐवजी काही ठेकेदारांच्या खासगी ट्रकमधून वाहून नेला जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. दोन दिवसांत सुमारे 100 टन ओला कचरा शहराबाहेर अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला. 

नारेगावचा कचरा डेपो बंद झाल्याने मनपा प्रशासन अडचणीत आले आहे. प्रशासनाने कचरा डेपोसाठी अनेक जागांची पाहणी केली, परंतु प्रत्येक ठिकाणी विरोध झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचले होते. मनपाच्या गाड्या संबंधित ठिकाणी गेल्या की नागरिकांकडून प्रखर प्रकारचा विरोध होतो आहे. म्हणून आता खा. खैरे यांनी म्हटल्याप्रमाणे मनपाने कचरा टाकण्यासाठी गनिमीकाव्याचा वापर सुरू केला आहे. ‘आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, गनिमीकाव्याने कचरा टाकू’, असे खैरे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याच पद्धतीने आता मनपाने शहरातील कचरा गुपचूप पद्धतीने बाहेर नेऊन टाकणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत मनपाने सुमारे शंभर टन कचरा अज्ञातस्थळी नेऊन टाकला आहे. विशेष म्हणजे मनपाच्या कचरा गाड्यांना विरोध होत असल्याने त्यावरही मनपाने नवीन शक्‍कल लढविली आहे. शहरात रस्ते आणि इतर विकास कामे करणार्‍या ठेकेदारांची या कामात मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या मालकीच्या खासगी ट्रकमधून हा कचरा वेगवेगळ्या भागात गुपचूप पद्धतीने नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागातील रस्त्यावरील कचरा उचलला गेला. 

सुका कचरा वाळूजच्या कंपनीला
शहरातील बहुसंख्य वॉर्डांत कचर्‍याचे ओला आणि सुका, असे वर्गीकरण केले जात आहे. ओल्या कचर्‍यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे खोदून कंपोस्टची प्रक्रिया केली जात आहे. आता सुक्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. वाळूज एमआयडीसीमध्ये सुका कचरा घेणार्‍या काही कंपन्या आहेत. तेथील एका कंपनीशी शहरातील सुका कचरा देण्याबाबत बोलणी सुरू झाली असून, मंगळवारीच सुका कचरा नेण्याचे काम ही कंपनी सुरू करणार असल्याचे महापौर घोडेले यांंनी सांगितले. 

महापौरांकडून दुजोरा
मनपाच्या वतीने गनिमीकाव्याने कचरा टाकला जात असल्याच्या वृत्ताला महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील दुजोरा दिला. मनपाने दोन दिवसांत शंभर टन कचर्‍याची विल्हेवाट लावली आहे. हा कचरा अज्ञातस्थळी टाकण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.