Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Aurangabad › संलग्‍नता शुल्कच्या बेपत्ता 100 कोटींची झाडाझडती 

संलग्‍नता शुल्कच्या बेपत्ता 100 कोटींची झाडाझडती 

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:36AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संलग्‍नता, विषयवाढ, तुकडीवाढ आदी शुल्कापोटीच्या 100 कोटींहून (अंदाजे 145 कोटी रुपये) रकमेचा हिशेब न लागणे, तसेच इतर आर्थिक अनियमिततांच्या आरोपांबाबत उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने विद्यापीठात झाडाझडती घेतली. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकार्‍यांनी विशेष कार्य अधिकार्‍यांकडे संलग्नता शुल्काचा हिशेब मागितला असता त्यांनी हिशेब सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्याची विनंती केली. संलग्नता शुल्क वसुलीतील अनियमिततेबाबत ‘कॅग’नेही विद्यापीठावर ताशेरे ओढले होते हे विशेष.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. प्रशांत बंब यांनी विद्यापीठातील कथित आर्थिक अनियमिततांबाबत विधानसभेत लक्षवेधी करून चौकशीची मागणी केली होती. सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे पथक विद्यापीठात धडकले. या पथकाने आर्थिक अनियमिततांच्या आरोपांची चौकशी केली. महाविद्यालयांकडून विद्यापीठाला दरवर्षी संलग्नता शुल्क मिळते. 

याशिवाय विषयवाढ, तुकडीवाढ यासाठीही शुल्क मिळते, परंतु 1996 पासून या शुल्काचा हिशेब लागत नसून ही रक्कम 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. पथकाने या अनियमिततेबाबत विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाला धारेवर धरले. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांनी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांना संलग्नता आणि तत्सम शुल्काचा हिशेब देण्यास सांगितले. डॉ. सरवदे यांनी या हिशेबासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली. 

पाच विभागांवर शिस्तभंगाच्या कारवाईची सूचना

पथकाने विद्यापीठातील सर्व विभागांची तपासणी केली. केमिकल टेक्नॉलॉजी, पत्रकारिता, प्राणिशास्त्र, जैवरसायन आणि भौतिकशास्त्र या विभागांकडे त्यांनी केलेल्या खरेदीचे रेकॉर्ड नसल्याचे आढळले. या विभागांनी खरेदी व्यवहारांचा लेखाजोखा द्यावा, अन्यथा विद्यापीठाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई  करावी, अशी सूचना पथकाने विद्यापीठाला केली.