Tue, Mar 26, 2019 21:57होमपेज › Aurangabad › कोर्टाच्या आवारात धुडगूस घालणारे दहा अटकेत

कोर्टाच्या आवारात धुडगूस घालणारे दहा अटकेत

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी (29 जानेवारी) जिल्हा न्यायालयात आणण्यात आलेल्या सुपारी किलर इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांवर तुफान दगडफेक झाली होती. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून धरपकड करून दोन्ही गटांच्या दहा आरोपींना अटक केली. यात कुरेशीचे चार, तर मेहंदीचे सहा समर्थक आहेत. कुरेशी समर्थकांना 1 फेब्रुवारीपर्यंत तर मेहंदी समर्थकांना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले. 

याप्रकरणी सर्व दहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या इतर साथीदारांना      अटक करणे, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणे बाकी असून, हल्ल्यामागे आरोपींचा काय उद्देश होता याचाही सखोल तपास करायचा आहे. त्यामुळे सर्व आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी केली. ही विनंती मान्य करून सलमान सलीम कुरेशी, फईम सलीम कुरेशी, अर्शद कुरेशी, अब्दुल हमीद कुरेशी या आरोपींना गुरुवारपर्यंत (1 फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हबीब इद्रीस हबीब मोहम्मद, हबीब खालेद हबीब मोहम्मद, मोहम्मद खालेद मोहम्मद अजहर, शेख फैय्याद शेख रियाज, सलीम बिन जुमान बिन माजी, शेख अतिक शेख लतीफ यांना मंगळवारपर्यंत (6 फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हे आहेत आरोपी...

जिल्हा व सत्र न्यायालय आवारात धुडगूस घातल्यानंतर दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या. मेहंदी गटातर्फे मोहमंद खालेद मोहमंद अजहर (वय 27, रा. आसेफिया कॉलनी) यांनी तक्रार दिली. यात फहीम कुरेशी, सलमान कुरेशी (रा. आसेफिया कॉलनी), अर्शद कुरेशी, रियाज कुरेशी, जाकीर कुरेशी, अबरार कुरेशी, अन्नू कुरेशी, अब्दूल हमीद कुरेशी (रा. सर्व, सिल्लेखाना) व इतर साठ ते सत्तर जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

कुरेशी समर्थकांतर्फे अर्शद हमीद कुरेशी (वय 25) यांनी तक्रार दिली. यात शेख सद्दाम, शेख इमाम (रा. कटकटगेट), हबीब इद्रीस हबीब मोहमंद, हबीब खालेद हबीब मोहमंद (रा. दोघे युनूस कॉलनी), मोहमंद खालेद मोहमंद अझहर (रा. आसेफिया कॉलनी), शेख फय्याज शेख रियाज (रा. सिल्लेखाना), सलीम बीन जुमानबीन माजी (रा. हिमायतबाग), शेख अतिक शेख लतीफ (रा. चेलीपुरा), फरेदखान फेरोजखान, शेख हसन शेख हुसेन, मोहंमद शोएब, मोहंमद सादीक (रा. रोशनगेट) यांच्यासह एकूण पंधरा ते वीस जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. बी. कोपनर करीत आहेत. 


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

जिल्हा न्यायालय परिसरात सोमवारी हल्ला झाल्यामुळे मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात थेट हर्सूल कारागृहातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. सोमवारी एकाची, तर मंगळवारी दुसर्‍याची साक्ष नोंदवण्यात आली. 

फुटेजवरून धरपकड सुरूच

जिल्हा न्यायालयाच्या आवारात धुडगूस घालत दगडफेक करणारे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हे फुटेज गुन्हे शाखा, वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयितांची ओळख पटवून आरोपींची धरपकड सुरू आहे. दरम्यान, सोमवारच्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.