Sat, Nov 17, 2018 05:55होमपेज › Aurangabad › ‘आधी पोलिसांना बोलवा, नंतर दार उघडा’

‘आधी पोलिसांना बोलवा, नंतर दार उघडा’

Published On: Aug 31 2018 1:55PM | Last Updated: Aug 31 2018 2:00PMआळंद : प्रतिनिधी

आळंद बोरगाव रस्त्यावरील पिंप्री(ता. फुलंब्री) येथील  एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल रात्री १२ च्या दरम्यान घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींची नावे कृष्णा तात्याराव देवरे (वय ३०), पत्नी शिवकन्या कृष्णा देवरे( वय २५) आणि सर्वदा कृष्णा देवरे (वय ६), इंदवी कृष्णा देवरे(वय ५) या दोन मुली आहेत. यातील कृष्णा देवरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर पत्नी व मुली पलंगावर  मृतावस्थेत आढळले. पिंप्री येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तात्याराव देवरे यांच्या मुलासह सून व दोन नातींचा मृत्यु झाला आहे.

कृष्णा तात्याराव देवरे हे आपल्या आई वडील व कुटुंबासह एकाच ठिकाणी वेगळ्या घरात  राहत होते. आई वडील नेहमी प्रमाणे काम करत असताना आजा सकाळी बराच वेळ कृष्णा देवरे यांच्या घराच्या दरवाजा न उघडल्याने पहायला गेले. तेव्हा त्यांना दरवाज्याला एक चिट्टी लावलेली आढळली. त्यामध्ये लिहले होते की, ‘आधी पोलिसांना फोन करा नंतर दरवाजा उघडा’ तसेच चिठ्ठीवर आठ वेळेस राम राम लिहले होते. आत डोकावून पाहिले असता कृष्णा हे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर आई वडीलांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.

पोलिस पाटील पांडुरंग पवार यांनी वडोदबजार पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील आपल्या सहकऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडोदबजार प्राथमिक केंद्रात पाठविला. घटनास्थळी पोलिस अधीक्षक आरती सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली. मात्र, आत्महत्या की घातपात याबाबत कोणतेही कारण समजू शकले नाही.