पॅन नंबर चुकल्यास कितीला 'कात्री' लागते?

Last Updated: Dec 26 2019 1:27PM
Responsive image


सतीश जाधव

आधार नंबर आणि पॅन नंबर असल्याशिवाय प्राप्तीकर विवरण भरता येत नाही. परंतु त्याचा वापर करताना चूक झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड भरण्याची वेळ येऊ शकते. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्रालयाने नियमांची अधिसूचना काढली आहे. म्हणूनच प्राप्तीकरदात्याने आधार नंबर किंवा पॅन नंबर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, जर खबरदारी घेतली नाही आणि घाईगडबडीत चुकीचा नंबर टाकल्यास दहा हजारांचा दंड बसू शकतो. 

केंद्र सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर अधिनियम 272 बी मध्ये दुरुस्ती केली आहे. त्यात प्राप्तीकर अधिनियम कलम 272 नुसार जर एखाद्या व्यक्तीने भरलेले पॅन किंवा आधार क्रमांक चुकीचा असेल, तर प्राप्तीकर अधिकारी त्यास दहा हजारांचा दंड आकारू शकतो. कर सल्लागार के. सी. गोदुका यांच्या मते, प्राप्तीकरदात्यास दंड आकारल्यानंतर संबंधितास बाजू मांडण्याचाही अधिकार दिला जाऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी ही अधिकार्‍यावर राहील. रिटर्न भरताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण अडचणीत सापडणार नाही, असे कर सल्लागारांचे मत आहे. रिटर्न भरण्यापूर्वी प्राप्तीकर खात्याच्या संकेतस्थळावर पॅनची पडताळणी करण्याचा पर्याय समोर येतो. त्यानंतरच रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू होते.