होमपेज › Arthabhan › लक्ष्मीची पावले : अर्थव्यवस्था 7.4 टक्क्यांनी वाढणार

लक्ष्मीची पावले : अर्थव्यवस्था 7.4 टक्क्यांनी वाढणार

Published On: Feb 11 2019 1:21AM | Last Updated: Feb 11 2019 1:29AM
डॉ. वसंत पटवर्धन
 

गेल्या शुक्रवारी शेअरबाजार उघडताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 36808, 11027 होते. टाटा मोटर्सने जग्वार लँड रोव्हरच्या जिंदगीचे मूल्यमापन करून 26961 कोटी रुपये तोटा दाखवला आहे. एल अँड टी फायनान्सने अडाग समूहाचे बरेचसे शेअर्स गेल्या आठवड्यात विकले. त्यात आर पॉवरच्या 6.25 कोटी शेअर्सचा अंतर्भाव होता. 

ग्राफाईट इंडियाने डिसेंबर 2018 तिमाहीसाठी एकत्रित नफ्यात 112 टक्के तर नक्‍त नफ्यात 72 टक्के वाढ दाखवली आहे. नक्‍त विक्री 1855 कोटी रुपये होती. डिसेंबर 2017 तिमाहीपेक्षा ती 81 टक्क्याने जास्त आहे. येत्या तिमाहीसाठी नक्‍त नफा 764 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2.17 तिमाहीसाठी तो 1025 कोटी रुपयांच्या विक्रीवर 359 कोटी रुपये होता. ग्राफाईट इंडियाच्या बंगलोरच्या कारखान्यावर  पर्यावरण खात्याने बंदी घातल्यामुळे त्या शेअरबाबत नैराश्य  पसरले होते. त्यामुळे बाजारात भाव 511 रुपयांपर्यंत गडगडला होता. तो शेअर  पुन्हा किमान 700 रुपये जाऊ शकेल. कारण बंगलोरच्या कारखान्यावरील बंदी आता हटवली गेली आहे. वर्षभरातील शेअरचा उच्चांकी भाव 1127 रुपये होता तर किमान भाव 458 रुपये होता. रोज सुमारे 15 लाख शेअर्सचा व्यवहार होतो.

या अनुषंगाने HEG चा भावही वाढू शकेल. सध्या तो 2400 रुपयांच्या आसपास आहे. वर्षातील उच्चांकी भाव 4955 रुपये होता तर नीचांकी भाव 1911 रुपये होता. कंपनीच्या प्रवर्तक व मुख्य अधिकार्‍याचे नुकतेच निधन झाल्यामुळे गुलशनकुमार सखुजा यांची प्रमुख वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक केली गेली आहे. कंपनीत  ते 2009 सालपासून कामावर आहेत. ओ. पी. अजमेरा हेही या समूहात 1987  पासून आहेत. त्यांनाही अतिरिक्‍त वित्तीय अधिकारी म्हणून नेमले आहे. 

दिवाण हौसिंग फायनान्सचा भाव घसरत 115 रुपयांपर्यंत आला आहे. निदेशकांचा या शेअरवरील विश्‍वास वाढवण्यासाठी कंपनी एक बलदंड भागीदार हुडकत आहे. आपल्या काही जिंदगीची ती विक्री करेल व आपली द्रवता वाढवेल. कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे  30000 कोटी रुपये दुसरीकडे वळवल्याची अफवा आहे. कुणीतरी विकास शेखर या नावाच्या व्यक्‍तीने असा आरोप केला आहे. 

हिंदुस्थान  पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम अंतरिम लाभांश देण्याची शक्यता असल्याने या शेअर्सचे भाव गेल्या आठवड्यात वाढले. मात्र कंपनीच्या डिसेंबर 2018 तिमाहीचा नफा 87 टक्क्याने घसरला आहे व तो 248 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबर 2017 च्या तिमाहीसाठी तो 1950 कोटी रुपये होता. मात्र अनेक विश्‍लेषकांनी डिसेंबर 2018 मध्ये कंपनी 67 कोटी रुपये तोटा दाखवील, अशी भीती व्यक्‍त केली होती ती खोटी ठरली आहे. कंपनीला ऑक्टोबरपासून पेट्रोलच्या किंमती घटवाव्या लागल्या होत्या. हिंदुस्थान पेट्रोलियम शेअरसाठी 10 रुपये अंतरिम लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे, तर भारत पेट्रोलियमकडून 14 रुपये लाभांशाची अपेक्षा आहे. डिसेंबर 2018 तिमाहीचे आकडे कंपनी 8 फेब्रुवारीला प्रसिद्ध करणार होती. हे दोन्ही शेअर्स भाग भांडारात थोडेतरी हवेत. 

गेल्या बुधवारी रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली. बाजारात त्यामुळे आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. नागरी सहकारी बँकांसाठी रिझर्व्ह बँकेने एक कार्यशाळा नियुक्‍त केली असून ती कृषी कर्जाबाबत विचार करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय नियोजन कमिटीने रेपो दरात जरी कपात केली असली व तो 6॥ टक्क्यांवरून 6। टक्क्यांवर आणला असला तरी हा निर्णय एकमताने न होता (सर्वसंमतीने) 4 विरुद्ध 2 मताने झाला होता. नव्याने नियुक्‍त झालेल्या गव्हर्नरांनी कपातीच्या बाजूने मत दिले होते. या कपातीमुळे बाजारात अल्पमुदती तेजी येऊ शकते. रिझर्व्ह बँकेने परदेशी गुंतवणुकीचे नियमही शिथिल केले आहेत. तसेच नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाबाबतही पुन्हा विचारविनिमय केला जाणार आहे. 2019-20 या वित्तीय वर्षासाठी अर्थव्यवस्था 7.4 टक्क्याने वाढेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. 

भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमवर वर आधी लिहिले आहे. याच क्षेत्रात चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा भाव 232 रुपयांवर आला आहे. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव 387 रुपये होता.