Tue, Mar 19, 2019 15:39होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता 

अर्थवार्ता 

Published On: Sep 10 2018 1:19AM | Last Updated: Sep 09 2018 8:30PMप्रीतम मांडके

 गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स एकूण अनुक्रमे 91.40 व 255.25 अंकांची घसरण दर्शवून 11589.1 व 38389.82 अंकांच्या पातळीवर बंद झाले. घसरत्या रुपयाच्या पार्श्‍वभूमीवर  गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्सने एकूण 0.78 टक्के व 0.66 टक्क्यांची पडझड दर्शवली. 

 गतसप्ताहात भारतीय रुपया चलनाने प्रतिडॉलर 72.12 च्या किमतीचा ऐतिहासिक तळ गाठला. परंतु सलग सात सत्रातील घसरणीला गतसप्ताहात शुक्रवार अखेर काहीसा पायबंद बसला. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्यामुळे शेवटच्या दिवशी रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 26 पैसे भक्कम होऊन 71.73 च्या पातळीवर स्थिरावले. गेल्या वर्षभरात रुपया चलनात 13 टक्क्यांची घसरण झाली. 

 वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीच्या पार्श्‍वभूमीवर 10 वर्षांच्या कर्जरोख्याच्या दरांनी 2014 सालानंतर प्रथमच 8 टक्के दराची सीमारेषा ओलांडली. गतसप्ताहात रोख्यांच्या दरांनी 8.11 टक्क्यांचा उच्चांकी भाव दर्शवून शुक्रवार अखेर 8.031 टक्क्यांचा  बंदभाव दिला.

 आंतरराष्ट्रीय  पातळीवर ब्रेंट क्रुड (कच्च्या तेलाच्या) किमती वधारल्याने महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने 87 रुपये प्रतिलिटरची पातळी ओलांडली. शुक्रवार अखेर गतसप्ताहात शुक्रवार अखेर ब्रेंट कुडच्या किमती 77.01 डॉलर किमतीच्या जवळपास स्थिरावल्या. 

 ऑगस्टअखेर म्युच्युअल फंड गंगाजळी मूल्य 25.2 लाख कोटींवर पोहोचले. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हा आकडा 20.6 लाख कोटींवर होता, त्याचप्रमाणे मागील महिन्यात जुलैअखेर म्युच्युअल फंड मत्ता एकूण 23.06 लाख कोटी होती. केवळ एका महिन्यात गंगाजळीत तब्बल 8.41 टक्क्यांची भर पडली.

 दिवाळखोरीशी संबंधित प्रकरणे हाताळणारी ‘एनसीएलएटी’ या नियंत्रण प्राधिकरण संस्थेने ‘एस्सार स्टील’ या दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीच्या खरेदीसाठी ‘आर्सेलर मित्तल’ व ‘न्यू मेटल’या दोन्ही कंपन्या मात्र असल्याचे स्पष्ट केले. 

 ‘रिलायन्स होम फायनान्स’ आंतरराष्ट्रीय इक्विटी गुंतवणूकदार कंपनीमार्फत 1500 केाटींचा निधी उभा करण्याच्या तयारीत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारास कंपनीमधील 24.99 टक्क्यांपर्यंत हिस्साविक्री  करण्याचा प्रस्ताव.  जून 2018 अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये भारताची ‘चालू खात्यातील तूट’ (करंट अकाऊंट डेफिसिट) ‘जीडीपी’च्या तुलनेत 2.4 टक्क्यांवर  पोहोचला. भारताची चालू खात्याची तूट मागील वर्षी असणार्‍या 15 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2019 च्या पहिल्या तिमाहीत 15.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 

 देशातील वाहतुकीचे पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पुढील 10 वर्षांत सुमारे 10 हजार सीएनजी गॅस स्टेशन उभे करण्याचा प्रस्ताव; प्रस्ताव अंमलात आणला गेल्यास देशाची वर्षाकाठी 2 लाख कोटींची बचत होईल. सध्या देशात 1424 सीएनजी स्टेशन्स अस्तित्त्वात ः  पेट्रोलियम मंत्री  धमेंद्र प्रधान यांची माहिती. 

 व्होडाफोन आयडियाया दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने 5 वर्षांच्या कालावधीसाठी 10.9 टक्के व्याजदराने अपरिवर्तनीय (नॉन-कर्न्व्हटिबल) डिबेंचर्सच्या माध्यमातून 1500 कोटी रुपयांचा निधी कर्जस्वरूपात उभा केला. 

 30 जूनअखेर संपलेल्या रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये, सुमारे दशकभराच्या अवधीनंतर 8.46 मेट्रिक टनांचा सोन्याचा साठा रिझर्व्ह बँकेकडून खरेदी करण्यात आला. सध्याच्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँकेकडे सुमारे 566.23 मेट्रिक टनांचा सोन्याचा साठा राखीव ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सोने खरेदीमुळे सोने धातूच्या भावात वृद्धीचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

एफएमसीजी क्षेत्रातील देशातील बडी कंपनी ‘आयटीसी’ लवकरच अमूल, ब्रिटानीया कंपन्यांप्रमाणेच दुग्धोत्पादन तसेच दुग्धव्यवसाय पदार्थ उत्पादन क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत. 
 कर्जाच्या बोजाखाली दबलेले 12 ऊर्जा प्रकल्प ‘राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणा’कडे (एनसीएसटी) दिवाळखोरी प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी वर्ग केले जाणार. त्याचप्रमाणे 1.8 लाख कोटी किमतीचे एकूण 34 ऊर्जाप्रकल्प लवकरच दिवाळखोरी प्रक्रियेसाठी ‘एनसीएसटी’कडे वर्ग केले जाण्याच्या मार्गावर. ‘कॉम्प्लॅन’ सारखे उत्पादन असणारी एफएमसीजी क्षेत्रातील ‘व्हाईन्झ क्राफ्ट’ कंपनी खरेदी करण्यासाठी कोका-कोला तसेच झायडस कॅटेला उत्सुक; सुमारे 500 ते 550 दशलक्ष डॉलर्स (3500 ते 4000 कोटी)  मध्ये व्यवहार हेाण्याची शक्यता.