अर्थवार्ता

Last Updated: Jan 13 2020 1:01AM
Responsive image


गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्सने निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने एकूण अनुक्रमे 30.15 आणि 135.11 अंकांची वाढ दर्शवून 1256.8 अंक तसेच 41599.72 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी निर्देशांकाने आतापर्यंतची सर्वोच्च विक्रमी अशी 12311.2 अंकांच्या पातळीला स्पर्श केला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांनी अनुक्रमे 0.25 टक्के आणि 0.33 टक्क्यांची वाढ दर्शवली.

भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची सकारात्मकतेकडे वाटचाल. सतत तीन महिने औद्योगिक उत्पादन निर्देशांक घटल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात निर्देशांक 1.8 टक्क्यांपर्यंत वधारला. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) समाविष्ट असणार्‍या उद्योगांच्या एकूण 23 प्रकारांपैकी 13 प्रकारांच्या उद्योगांनी वाढ दर्शवली.

टाटा उद्योग समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’च्या प्रमुखपदी ‘सायरस मिस्त्री’ यांची पुनर्नियुक्ती करण्याच्या एनसीएलएटी (राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरण)च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 2012 साली टाटा समूहाच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्रींची निवड झाली होती परंतु 2016 साली त्यांना पदावरून दूर करण्यात आले. याप्रकरणी कंपन्यांसंबंधी तंट्यांचा निवाडा करणार्‍या एनसीएलएटीने मिस्त्रींच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्दबातल करून टाटांच्या बाजूने निर्णय दिला.

आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळणार्‍या ‘ईडी’ (इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट)ने आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोच्चर यांनी 78 कोटी मालमत्तेवर टाच आणली. जून 2009 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान व्हिडिओकॉन समूहाला नियमबाह्य 1875 कोटींचे कर्जवाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याबदल्यात चंदा कोचर यांच्या पतींच्या कंपनीत म्हणजेच दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटींची रक्कम व्हिडिओकॉन समूहाकडून गुंतवण्यात आल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. परंतु, यासंबंधीचे सर्व आरोप चंदा कोचर तसेच व्हिडिओकॉन उद्योग समूहाकडून फेटाळण्यात आले आहेत.

वर्ष 2019 मध्ये वाहन उद्योगाला मंदीचे ग्रहण. वाहनविक्री मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 14 टक्क्यांनी घटली. मागील 20 वर्षांतील सर्वाधिक घट म्हणून ही घट गणली गेली. मंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी/उद्योग वाहनांना (कमर्शिअल व्हेईकल)ना बसला. व्यापारी वाहनांच्या विक्रीतून 15 टक्क्यांची तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीत 13.8 टक्क्यांची घट झाली.

येस बँकेने आपल्या समभागधारकांकडून 10 हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी परवानगी मागितली. कॅनडाच्या शर्विन ब्रीच यांच्याकडून येस बँकेमध्ये 1.2  अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्याचप्रमाणे सिटेक्स होल्डिंगकडून आलेला 500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 3500 कोटी) गुंतवणुकीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संचालक मंडळाचे प्रतिपादन.

भारती एअरटेलच्या 3 अब्ज डॉलर्सच्या निधी उभारणीसाठी तिप्पट प्रतिसाद मिळून तब्बल 9 ते 10 अब्ज डॉलर्स किमतीच्या बोली लागल्या. 2 अब्ज डॉलर्सचा निधी क्युआयपीद्वारे तसेच 1 अब्ज डॉलर्सचा निधी परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांद्वारे उभा करण्याचा भारती एअरटेलचा मानस. निधी गुंतवणुकीसाठी फिजिलिटी, ब्लॅकरॉक गोल्डमन तसेच जीआयसी यांसारखे परकीय गुंतवणूकदार उत्सुक. या निधीचा उपयोग भारती एअरटेल 35500 कोटींची थकीत देणी (एजीआर ड्यूज) परतफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी वाधवान ग्लोबल कॅपिटल समूहाकडून ‘डीएचएफएस जनरल इन्श्युरन्स कंपनी’ 100 कोटींना खरेदी केली. डीएचएफएल जनरल इन्श्युरन्स कंपनीचे व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य सध्या 400 कोटींचे आहे.
व्यापारी तत्त्वावर कोळसा उत्खननक्षेत्र यापुढे सर्व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी खुले करण्याचा कोळसा मंत्रालयाचा निर्णय.
डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा ओघ पूर्ववत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये 8518 कोटींची गुंतवणूक करण्यात आली.
रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी परदेशातून सुमारे 2 अब्ज डॉलर्स (14370 कोटी)चे कर्ज उभे करणार.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारताच्या जीडीपी वृद्धीदर 5 टक्क्यांच्या जवळपास राहण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. मागील 11 वर्षांतील सर्वात कमी वृद्धीदर अंदाज यावर्षी व्यक्त करण्यात आला.
3 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गंगाजळीत तब्बल 3.7 अब्ज डॉलर्सची भर पडून गंगाजळी 461.16 अब्ज डॉलर्स झाली.