अर्थवार्ता

Last Updated: Oct 21 2019 1:30AM
Responsive image


प्रीतम मांडके
 
गत सप्तहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे 356.80 आणि 1171.30 अंकांची वाढ दर्शवून 11661.85 व 3929.38 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात 3.16 टक्के आणि 3.07 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निर्देशांकातील उसळीमुळे बाजारभांडवल मूल्य सुमारे 6 लाख कोटींनी वधारले. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंग्डम यांच्यात ब्रेग्झिटबाबत झालेल्या सकारात्मक निर्णयामुळे,  त्याचप्रमाणे चीन आणि अमेरिका या महासत्तांमध्ये व्यापारयुद्ध विरामाविषयी झालेल्या सकारात्मक चर्चांमुळे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण राहिले.
 
चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा तब्बल 18 टक्के वधारून 11262 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 4.8 टक्के वाढून 163854 कोटी झाला. त्याचप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील कंपनी रिलायन्स जिओचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत थेट 45 टक्क्यांनी वधारून 990 कोटींपर्यंत पोहोचला. कंपनीच्या समभागाने निकालानंतर 9 लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा पार केला. 9 लाख कोटींच्या बाजारभांडवलाचा टप्पा पार करणारी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ देशातील पहिली कंपनी ठरली. दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजारभांडवलमूल्य सध्या 7.7 लाख कोटी आहे.
 
सप्टेंबर महिन्यात भारताची निर्यात 6.57 टक्के घसरून 26.03 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. तसेच आयात तब्बल 13.85 टक्के घटून 36.89 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. याचा परिणाम म्हणून भारताची व्यापारतूट मागील 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 10.86 अब्ज डॉलर्सपर्यंत खालावली. निर्यातीच्या एकूण 30 क्षेत्रांपैकी केवळ 8 क्षेत्रांमध्ये वाढ झाली. बाकी 22 क्षेत्रांमध्ये घट झाली.
 
सप्टेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई निर्देशांक (रिटेल इन्फ्लेशन) 3.99 टक्क्यांवर पोहोचले. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर 3.28 टक्के होता. किरकोळ खाद्यान्न महागाई दर सर्वाधिक म्हणजे 5.11 टक्के वधारला. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भाज्यांच्या दरांमध्ये सरासरी 15.4 टक्क्यांची वाढ झाली. सध्या रिझर्व्ह बँकेच्या मध्यमकालीन उद्दिष्टानुसार किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राखला जाणार आहे. त्याचप्रमाणे देशातील घाऊक महागाई दर (होलसेल प्राईस इंडेक्स) मागील तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला. महागाई दर अपेक्षित असलेल्या उद्दिष्टास अनुसरून आल्याने डिसेंबर महिन्यात पाव टक्का व्याजदर कपातीची अपेक्षा अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
 
जगातील दोन महासत्ता चीन-अमेरिका यांच्यामध्ये असलेल्या व्यापारयुद्धाचा गंभीर परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला. चीनचा जीडीपी वृद्धीदर तिसर्‍या तिमाहीत मागील 27 वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 6 टक्क्यांवर खाली आला. मागील वर्षी चीनच्या जीडीपीने 6.6 टक्क्यांचा वृद्धीदर दर्शवला होता. यापूर्वी 1992 साली चीनचा जीडीपी 6 टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या द़ृष्टीने चीनची सरकारी बँक ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ 28 अब्ज डॉलर्सचा मदतनिधी अर्थव्यवस्थेस देणार.
 
व्यवसाय विस्तारासाठी जेएसडब्ल्यू स्टील लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन मार्फत ‘नॉनकन्व्हर्टीबल डिबेंचर्स’च्या स्वरूपात 2 हजार कोटींचा निधी उभा करणार.
 
सरकारी तेल विपणन क्षेत्रातील कंपनी ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’  रोख्यांमार्फत 6 हजार कोटींचा निधी उभा करणार रुपया चलन स्वरूपात जारी करण्यात येणार्‍या रोख्यांचा परतावा 7.5 टक्के ते 7.6 टक्क्यांच्या जवळपास असण्याचा तज्ज्ञांचा अंदाज.
 
एफएमसीजी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’चा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचा नफा अपेक्षेनुसार. नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 21.18 टक्क्यांची वाढ होऊन नफा 1848 कोटींवर पोहोचला. तसेच उत्पादनांच्या विक्रीत 6.7 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 9852 कोटींवर पोहोचली.
 
टीव्हीएस मोटर्सचा दुसर्‍या तिमाहीचा नफा 21 टक्के वधारून 255 कोटींवर पोहोचला.
 
ऑक्टोबर 11 रोजी संपलेल्या सप्ताहात भारताच्या परकीय गंगाजळीत भरघोस वाढ. परकीय गंगाजळीत एका सप्ताहात तब्बल 4.24 अब्ज डॉलर्सची भर पडून परकीय गंगाजळीने 437.83 अब्ज डॉलर्सचा विक्रम केला होता. त्यामध्ये आणखी 1.879 अब्ज डॉलर्सची भर पडून 439.712 अब्ज डॉलर्स किमतीच्या गंगाजळीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
(मांडके फिनकॉर्प)