Wed, Jul 08, 2020 00:21होमपेज › Arthabhan › डेबिट-क्रेडिट कार्ड्सना ‘लॉक-अनलॉक’चे कवच

डेबिट-क्रेडिट कार्ड्सना ‘लॉक-अनलॉक’चे कवच

Published On: May 13 2019 2:07AM | Last Updated: May 13 2019 2:07AM
सुभाष वैद्य

डिजिटल व्यवहाराचा सध्या बोलबाला आहे. नोटाबंदीनंतर तर ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या आर्थिक संस्था ऑफरही देत आहेत. ही ऑफर कॅशबॅक, दहा टक्के सवलत या स्वरूपात ग्राहकांना मिळते. या ऑफरला भरीस पडून ग्राहक मर्यादेपेक्षा अधिक खर्च करतात. हा खर्च कधी कधी आर्थिक अडचणीत आणू शकतो. या अमर्यादित खर्चाचा फायदा हॅकरही घेऊ शकतात. सध्या सरसकट ऑनलाईन आणि कार्डने व्यवहार करण्याचे प्रमाण वाढल्याने फसवणुकीचेही प्रकार तितकेच वाढले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांचे कार्ड सुरक्षित रहावे आणि व्यवहारात गैरप्रकार घडू नये यासाठी अनेक बँकांनी कार्डला ऑन किंवा ऑफचे बटण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहक खरेदी आटोपल्यानंतर कार्ड लॉक करू शकतो आणि ते पुन्हा वापरात आणण्यासाठी अनलॉक करू शकतो. या सोयीमुळे कार्डचे डिटेल लिक होण्याचा धोका राहत नाही. कार्डवर दररोज खर्चाची मर्यादा निश्‍चित केली तरी नुकसानीचे प्रमाण कमी करू शकतो.
तीन पद्धती : डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या खर्चाची मर्यादा कमी जास्त करण्यासाठी तीन पर्याय आहेत. त्या पर्यायांची माहिती घेऊ या. 

 नेटबँकिंग

कार्डवरील व्यवहार नियंत्रित करण्यासाठी नेटबँकिंगचा पर्याय सोपा आणि सुटसुटीत मानला जातो. त्यात सुरुवातीला नेटबॅकिंगमध्ये लॉगइन करा. त्यानंतर कार्ड ऑप्शनमध्ये विवरण भरा. त्यानंतर ग्राहकाने आपल्या कार्ड लिमिटचा अंकात उल्लेख करा. मासिक सरासरी खर्च पाहून कार्डची मर्यादा निश्‍चित करावी. तसेच परदेशातून देवाण-घेवाणीचा पर्यायदेखील बंद करण्याचा पर्याय ग्राहकाला निवडता येतो. 

 फोन बँकिंग

कस्टमर केअरशी संपर्क साधून खर्चाची मर्यादा निश्‍चित करू शकतो. 

 ऑन-ऑफचे बटण

आयसीसीआय बँकेसह अनेक बँकांनी अशा प्रकारची सुविधा दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय व्यवहारही लॉककरता येते

अनेकदा परदेशात एखाद्या अनोळख्या ठिकाणी आपल्या कार्ड डिटेलच्या मदतीने व्यवहार होतात. मात्र आपल्याला केवळ देशातच कार्डने व्यवहार करायचे असतील तर परदेशातील व्यवहाराची सुविधा बंद करू शकता. बँक किंवा आर्थिक संस्थांकडून अशा प्रकारची सुविधा दिली जाते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यवहारातील मर्यादादेखील निश्‍चित करता येते. 

खर्चाची मर्यादा निश्‍चित करा

कार्डवर दररोज खर्चाची मर्यादा निश्‍चित केल्यास अनेक फायदे आहेत. त्यातून कार्ड सुरक्षित राहतेच आणि खर्चावरही नियंत्रण ठेवता येते. काहीवेळा 95 टक्के खर्च कार्डच्या मदतीने करतात. मात्र एखाद्या दिवशी मोठ्या रकमेची खरेदी करायची असेल तर कस्टमर केअरला फोन करून किंवा नेटबँकिंगच्या मदतीने लिमिटमध्ये बदल करू शकता. तसेच नियमित वापरण्यात येणार्‍या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर पाच ते दहा हजारांची मर्यादा निश्‍चित करू शकता. त्यामुुळे अधिक व्यवहार केल्यास ते व्यवहार मंजूर होणार नाहीत. म्हणून मर्यादा विचारपूर्वक निश्‍चित करा. कार्डचे डिटेल लिक झाल्यास हॅकर मोठी रक्कम काढून घेऊ शकतो. अर्थात मोबाईल नंबर लिंक असल्याने अशा व्यवहाराची माहिती तत्काळ आपल्याला मिळते. त्यामुळे व्यवहार करताना मोबाईलवरही लक्ष असणे गरजेचे आहे.