गृहकर्जावरील टर्म प्लॅन फायदेशीर

Published On: Sep 09 2019 1:42AM | Last Updated: Sep 09 2019 1:42AM
Responsive image

विनायक सरदेसाई


विमा पॉलिसी ही अडचणीच्या काळात फायदेशीर ठरते. अशा स्थितीत डोळे झाकून विमा योजना घेण्याऐवजी त्याची खरेदी करताना योग्य चाचपणी करणे गरजेचे आहे. गृहकर्जाचा देखील विमा असतो. या श्रेणीत क्रेडिट शिल्ड होम लोन पॉलिसी हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यासंबंधी माहिती घेऊ या.

क्रेडिट शिल्ड पॉलिसी म्हणजे काय : जीवन विमा योजनेमध्ये टर्म प्लॅनच्या नावाने पॉलिसी दिली जाते. गृहकर्जाशी निगडित असलेल्या टर्म प्लॅनला क्रेडिट शिल्ड पॉलिसी म्हटले जाते. अर्थात साधारणपणे टर्म प्लॅनमध्ये वार्षिक हप्ता असतो. तर होम लोन क्रेडिट शिल्ड पॉलिसीत एकरकमी हप्ता भरावा लागतो. या पॉलिसीत होम लोनदेखील कव्हर होतो. क्रेडिट शिल्ड होम लोन स्किम योजनेंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवणे गरजेचे आहे. 

आपल्यासाठी फायदेशीर कसा : ज्याप्रमाणे कर्जातील मुद्दल कमी कमी होत जाते, त्यानुसार क्रेडिट शिल्ड पॉलिसीचे कवरदेखील कमी होत राहते. या योजनेत मिळणार्‍या सुविधा ही खासियत आहे. विमाधारक नसल्यास या पॉलिसीच्या मदतीने गृहकर्जाचे हप्ता भरले जातात. मात्र यासाठी विमा कंपन्यांकडे चकरा मारण्याची गरज विमाधारकाच्या कुटुंबीयाला करावी लागत नाही. विमा कंपनीचे अधिकारी स्वत: कागदपत्रांची पूर्तता करून पुढील कार्यवाहीसाठी मदत करतात. त्यामुळे अडचणीच्या काळात विमाधारकाच्या कुटुंबीयांना मोठा आधार राहतो. जेव्हा विमाधारकाकडे अगोदरच सामान्य टर्म प्लॅन असेल तर क्रेडिट शिल्ड पॉलिसी फायदेशीर ठरते. 

अधिक हप्ता तरीही स्वस्त : या पॉलिसीचा हप्ता हा सामान्य टर्म प्लॅनच्या तुलनेत अधिक असतो. सामान्यपणे टर्म प्लॅनमध्ये सुमारे 5 हजारांपासून 50 लाखांपर्यंतचा विमा मिळतो. क्रेडिट शिल्ड पॉलिसीचा हप्ता महाग असण्याचे प्रमुख कारण म्हणजे एकरकमी पैसे भरणे. मात्र  सामान्य जीवन विमा पॉलिसीसाठी दीर्घकाळ भरण्यात येणार्‍या हप्त्याच्या तुलनेत अधिक स्वस्त पडतो. जोखीम पाहून बँका अधिक हप्ता असणार्‍या विमा कंपन्यांशी करार करण्यास प्राधान्य देतात. 

दाव्याची प्रक्रिया सोपी : क्रेडिट शिल्ड पॉलिसीत बँक आणि गृहकर्ज देणार्‍या कंपन्या दोन प्रकारच्या पर्याय देतात. पहिला पर्याय म्हणजे दाव्याची रक्कम ही बँक थेट आपल्या खात्यात जमा करते आणि दुसरा पर्याय म्हणजे विमाधारकाच्या कर्जाच्या खात्यात ती रक्कम जमा करणे. दोन्ही प्रकरणात दाव्याचा निपटारा सहजपणे होतो. अर्थात विमा घेताना दाव्याची प्रक्रिया जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. दावा निकाली काढण्याचे प्रमाण सरासरी 90 टक्के आहे. हे प्रमाण 95 टक्के असणे हे चांगले लक्षण समजतात.

विमा का गरजेचा : गृहकर्ज हे बँकेच्या सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत मोडते. जर कर्जदार पैसे देण्यास असमर्थ ठरला, तर बँकेकडे संबंधित घर ताब्यात घेण्याचा अधिकार राखून ठेवतो. अशा स्थितीत कर्ज घेणार्‍याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांकडे कर्ज फेडण्याची क्षमता असेलच असे नाही. त्यामुळे दुर्दैवाने घर सोडण्याचीदेखील वेळ येऊ शकते. त्यामुळे या अडचणीतून वाचण्यासाठी बँका गृहकर्जावर विमा करण्यास सांगते. अशा स्थितीत कर्ज फेडण्याची जबाबदारी विमा कंपनीवर राहते.