कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना...

Published On: Sep 09 2019 1:42AM | Last Updated: Sep 09 2019 1:42AM
Responsive image

स्वाती देसाई


मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लवकरात लवकर आर्थिक नियोजन आवश्यक आहे. अशा स्थितीत फॅमिली प्लॅनिंगच्या अगोदर फायनान्शियल प्लॅनिंग करणे अत्यावश्यक आहे. यामुळे आपल्या पाल्यांचे भवितव्य सुरक्षित राहू शकते. तसेच कुटुंबाबरोबरच खर्च वाढीवरही सहजपणे मात करू शकतो. म्हणूनच कुटुंबाचा विस्तार करण्यापूर्वीच आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने आगामी खर्चाचे आकलन करता येते आणि त्यानुसार उत्पन्न आणि गुंतवणूक वाढवता येते. 

आर्थिक नियोजन करताना : मुलांसाठी नियोजन करताना अनेक खर्चाचा समावेश करावा. त्यात शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च, अन्य गरजा, विवाहाचा खर्च आदींचा समावेश करताना योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. यासाठी दीर्घकाळासाठी आणि कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचे विभाजन करावे. 

शिक्षणाच्या खर्चाचा हिशोब : मुलांच्या शिक्षणात किती खर्च येईल, याचा अंदाज बांधायला हवा. शिक्षणाच्या खर्चात प्राथमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज, उच्च शिक्षण याचा समावेश करावा. शिक्षण हे देशात किंवा परदेशात घ्यायचे आहे, यावरूनही खर्चाचे गणित बदलतात. मुलांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला किती पैसा लागतो, याचे आकलन करावे तसेच शिक्षणाबरोबरच अन्य खर्चाचादेखील हिशोब करायला हवा. 

उच्च शिक्षणाचे नियोजन : एक बिझनेस स्कूलची फी आज 25 लाख रुपये आहे. आपला मुलगा पाच वर्षानंतर प्रवेश घेणार असेल तर त्यात 8 टक्के महागाई दराने त्याची आकडेवारी जमवल्यास ती 36 लाखांपर्यंत जाते. एवढ्या शुल्काची तयारी आतापासूनच करायला हवी. 

शिक्षणासाठी स्मार्ट गुंतवणूक : शिक्षणासाठी एसआयपीदेखील सुरू करता येते. शिक्षणासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मचा विचार करायला हवा. प्राथमिक शिक्षणासाठी कमी कालावधीची गुंतवणूक योग्य ठरते. यासाठी डेट फंड्स, रिकरिंग डिपॉझिट, मुदत ठेवी याची निवड करू शकता. यात शाळेची फी, कोचिंग क्लास, अन्य गोष्टींसाठी गुंतवणूक करा. प्राथमिक नंतर उच्च शिक्षणासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायला हवी. दीर्घकाळासाठी उद्देश असेल तर इक्विटीमधील गुंतवणूक योग्य ठरते आणि त्यासाठी लार्ज/मिड/मल्टीकॅप फंडसमध्ये गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळासाठी लॉक इन इन्स्ट्रमेंटमधील गुंतवणूकदेखील योग्य मानली जाते. अनेक एएमसी (अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी)ने मुलांसाठी विशेष गुंतवणुकीसाठी योजना तयार केली आहे. जसे की दीर्घकाळासाठी फंड्सचा विचार केल्यास (लार्ज कॅप)एसबीआय ब्लूचिप फंड, अ‍ॅक्सिस ब्लूचिप फंड, याशिवाय दीर्घकाळासाठी फंड्सचा विचार केल्यास (मल्टी कॅप) कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप फंड, मोतीलाल ओसवाल मल्टीकॅप 35 फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. 

शिक्षणासाठी कर्ज घेताना : पैसे कमी पडले तर एज्युकेशन लोन महत्त्वाचे ठरते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्ज फेडावे लागते. त्याच्या रिपेमेंटवर व्याज 80 ईनुसार करात सवलत मिळते. 

मुलांच्या लग्नासाठी नियोजन : विवाहाचे वय, खर्च आणि कॉर्पससाठी खर्चाचे आकलन करायला हवे. मुलांच्या संभाव्य लग्नाचा खर्च पाहून गुंतवणूक सुरू करायला हवी. विवाहाच्या खर्चासाठी महागाई दराचा विचार करावा. 

विवाहाच्या नियोजनासाठी गुंतवणूक : सर्व खर्चाचा हिशोब केल्यास विवाहासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. सध्याच्या काळात नवीन गुंतवणूक करावी. संभाव्य ध्येय पाहता एसआयपी सुरू करावी. विवाहासाठी गोल्ड इटिएफमध्ये गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करता येते. इक्विटीमध्ये 80 टक्के आणि डेट फंडमध्ये 20 टक्के गुंतवणूक करावी. लार्ज/मिड/मल्टीकॅपमध्ये गुंतवणूक करावी. याशिवाय पीपीएफ, एनएससी यासारख्या योजनेतही गुंतवणूक करावी. यासाठी अनेक अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी लार्ज, मिडकॅप आणि मल्टीकॅप फंड्स सुरू केले आहेत. 
मुलांसाठी विमा आवश्यक : मुलांसाठी विम्याचा उपयोग केवळ सुरक्षेसाठी करावा, गुंतवणुकासाठी नाही. जीवन विमा आणि हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचे ठरते. यासाठी मासिक उत्पन्नाच्या दहा ते पंधरा पट सम एश्योर्ड असणारे टर्म प्लॅन असायला हवे. टर्म प्लॅनमुळे कुटुंबाला अप्रिय घटनांच्या काळात आर्थिक कवच मिळते.