आरोग्य विम्याचा हप्ता टप्प्याटप्प्यात भरा

Published On: Sep 30 2019 1:55AM | Last Updated: Sep 29 2019 8:45PM
Responsive image


विमा नियामक संस्था इर्डाने वैद्यकीय विमाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मेडिक्लेमचा हप्ता हा एकरकमी भरण्याऐवजी तिमाही किंवा सहामाहीच्या आधारावर भरता येणार आहे. आजच्या घडीला वैद्यकीय विमा ही अत्यावश्यक बाब बनली आहे. उपचाराचे वाढते खर्च पाहता विमा कवच महत्त्वाचे ठरत आहे. म्हणूनच कंपन्यादेखील कर्मचार्‍यांचा वैद्यकीय विमा उतरवत असल्याचे निदर्शनास येते. आपत्कालीन काळात योग्य आणि तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय विमा मोलाचा ठरतो. कॅशलेस वैद्यकीय विम्यामुळे ऐनवेळी येणार्‍या आर्थिक ताणापासूनही पॉलिसीधारकाची मुक्तता होते. वैद्यकीय विम्यातही अनेक प्रकार असून त्यात फॅमिली फ्लोटर, पर्सनल, ग्रुप विम्याचा समावेश आहे. आरोग्य विम्याचा हप्ता हा एकरकमी भरावा लागतो. मात्र इर्डाने हप्ता भरण्याच्या पद्धतीत बदल केला असून तो एलआयसीप्रमाणे तिमाही किंवा सहामाहीप्रमाणे हप्ता भरता येणार आहे. त्याचबरोबर इर्डा संस्थेने वयाची 65 ओलांडलेल्या नागरिकांनादेखील वैद्यकीय विमा देण्याचे आदेश दिले आहेत. इर्डाच्या निर्णयामुळे पॉलिसीधारकांना आरोग्य विमा उतरवणे सोयीचे झाले आहे. 

पॉलिसी कागदपत्रातही सवलत

विमाधारकांना पॉलिसीसंदर्भात चांगली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी इर्डा संस्थेने कंपन्यांना कागदपत्रात किरकोळ बदल करण्याची मुभा दिली आहे. अर्थात विमा कवचमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय विमा कंपनी कवचमध्ये बदल करू शकणार नाही, असे इर्डान म्हटले आहे. सध्या पाच लाखांच्या मेडिक्लेमवर 35 वयोगटातील व्यक्तीला आठ हजारांचा हप्ता भरावा लागतो. विमा कंपन्यांना एखादे खास उत्पादन आणण्यासाठी अतिरिक्त योजना आणण्याची परवानगी दिली आहे. अर्थात यात कोणत्याही प्रकारच्या नियमांत बदल करता येणार नाही. या नव्या बदलानुसार कंपन्या इर्डाची परवानगीची वाट न पाहताही एखादे उत्पादन म्हणजेच योजना बाजारात आणू शकतात. 

हप्ता भरण्याच्या निकषात बदल

पूर्वी वैद्यकीय विम्यासाठी एकरकमी हप्ता भरावा लागत असे. काहीवेळा ही रक्कम सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहते. इच्छा असूनही हप्त्यांमुळे मेडिकल विमा घेण्यास काही जण टाळाटाळ करतात. मात्र आता तिमाही आणि सहामाहीच्या आधारावर वैद्यकीय विमा काढता येणार आहे. या सुविधामुळे आगामी काळात वैद्यकीय विम्याला चालना मिळेल, अशी आशा आहे. 

व्यक्तिगत विम्याच्या वयात वाढ

इर्डाने विमा कंपन्यांना दिलासा देत वयाची 65 ओलांडलेल्या नागरिकांनाही आरोग्य विमा देण्याची मुभा दिली आहे. या बदलामुळे अधिक वयाच्या नागरिकांना वैद्यकीय विमा घेणे सोयीचे झाले आहे. तर विमा कंपनी गंभीर आजाराच्या निकषाबाबत बदल करत असेल तर त्याची माहिती इर्डाला द्यावी लागेल.