Sat, Aug 24, 2019 12:20होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Published On: Feb 11 2019 1:21AM | Last Updated: Feb 11 2019 1:29AM
प्रीतम मांडके

निफ्टी व सेन्सेक्सने गतसप्ताहात एकूण अनुक्रमे 49.95 व 77.05 अंकांची वाढ दर्शवली असून 10943.6 व 36546.48 अंकांच्या  पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण 0.46 टक्के व 0.21 टक्क्यांची वाढ झाली.रिझर्व्ह बँकेच्या  पतधोरण आढावा बैठकीत देशातील रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट दरात  पाव टक्क्यांची कपात करण्यात आली असून रेपो रेट दर 6.25 टक्क्यांवर निश्‍चित करण्यात आला. तसेच रिव्हर्स रेपो रेट दरातही पाव टक्क्यांची कपात करण्यात आली असून रिव्हर्स रेपो रेट दर 6 टक्क्यांवर  खाली आणण्यात आला. चालू वर्षात डिसेंबरपर्यंत महागाईदर 3.9 टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे संकेत. तसेच आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये अर्थव्यवस्था वृद्धीचा दर 7.4 टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

झी एन्टरटेन्मेंटची मालकी असणारा एस्सेल उद्योग समूह आर्थिक संकटात. एस्सेल समूहाकडून जारी करण्यात आलेल्या डिबेंचर्स तसेच इतर रोखेपत्रात सवलत देण्याची म्युच्युअल फंडांची सेबीला विनंती. एस्सेल उद्योग समूहात विविध म्युच्युअल फंडांची सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक. 

अनिल अंबानी उद्योग समूहाच्या ‘रिलायन्स टेलेकम्युनिकेशन’ कंपनीने दिवाळखोरी घोषित केल्यावर उद्योग समूहाच्या इतर कंपन्या, जसे की आर पॉवर, आर कॅपिटल, आर इन्फ्रा यांच्यामध्ये अनुक्रमे सुमारे 59 टक्के, 32 टक्के, 56 टक्क्यांची जबर घसरण. गहाण ठेवलेल्या समभागांची एल अँड टी फायनान्स तसेच इडेलवाईज विनाकारण विक्री करून समभागांचा भाव पाडत असल्याची अनिल अंबानींची टीका.

इंडस टॉवर आणि भारती इन्फ्राटेल यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या व्यवसायातील काही भागाची विक्री करून सुमारे 25 हजार कोटींचा निधी उभा करण्याची व्होडाफोन-आयडिया कंपनीची तयारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा तोटा 5005.7 कोटींपर्यंत पोहोचला. 

टाटा स्टील देशातील सर्वात मोठ्या पोलाद उत्पादन कंपनीचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत 54.33 टक्के वधारून 1135.92 कोटींवरून 1753.07 कोटींवर पोहोचला. स्टार्ट अप कंपन्यांसाठी केंद्रसरकारचा दिलासा. या कंपन्यांसाठी पुरवण्यात येणार्‍या भागभांडवलाच्या सीमारेषांची (शेअर प्रीमियम) पुनर्रचना.  करसवलतीची सीमारेषा 10 कोटींवरून 25 कोटींवर नेण्यात आली. 25 कोटींपर्यंत किंमत असलेल्या केणत्याही स्टार्टअप कंपन्या करांपासून मुक्‍त करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली. नियमावलीमध्ये काही जाचक अटींचा समावेश असल्याने ही नियमावली लागू झाल्यास व्हॉट्स अ‍ॅप बंद करण्याचा कंपनीने अधिकारी ‘वूग’ यांचा इशारा. सुमारे  9000 कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याची मालमत्ता विकण्यासाठी सक्‍त वसुली संचलनालयाची बँकांना परवानगी. एप्रिल ते डिसेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तब्बल 31000 कोटींची कर्जवसुली. बुडीत कर्जाचे प्रमाण 8 लाख 64 हजार कोटींपर्यंत खाली आल्याची केंद्र सरकारची लोकसभेत माहिती. 

हिरे व्यापारी नीरव मोदींकडून झालेल्या फसवणुकीमुळे संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बँकेला तीन तिमाहीनंतर 247 कोटींचा नफा झाला. एकूण अनुप्तादित मालमत्तेचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 16.33 टक्क्यांवर खाली आले. मागील तिमाहीत बँकेला 4532.35 कोटींचा तोटा झाला होता. 

टाटा मोटर्सचा तिसर्‍या तिमाहीचा तोटा 26961 कोटींपर्यंत पोहोचला. टाटा मोटर्सची उपकंपनी जॅग्वार लँडरोव्हरला चीनमधील विक्री घटल्याने सुमारे 3.1 अब्ज पाऊंड (सुमारे 27838 कोटींचा) फटका बसला. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत भारताची वित्तीय तूट ठरलेल्या उद्दिष्टाच्या 112 टक्क्यांवर म्हणजेच 7.01 लाख कोटींवर पोहोचली. आर्थिक वर्ष  2021 मध्ये वित्तीय तूट उद्दिष्ट सध्या असलेल्या 3.3 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले. परंतु सध्याच्या वर्षी 3.3 टक्‍का वित्तीय तुटीचे उद्दिष्ट साधण्यात सरकारला अपयश. 

एफएमसीजी क्षेत्रातील महत्त्वाच्या मारिको कंपनीचा तिसर्‍या तिमाहीचा नफा 12.7 टक्के वधारून 252 कोटींवर पोहोचला. कंपनीच्या महसुलात 15 टक्क्यांची वृद्धी होऊन महसूल 1861 कोटींवर पोहोचला. 501 कोटींच्या कर पुनर्रचनेसह देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सिमेंट कंपनी ‘एसीसी सिमेंट’चा नफा डिसेंबर तिमाहीत  733 कोटींवर पोहोचला. करपुनर्रचनेमुळे नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 256 टक्क्यांची वाढ झाली. तसेच विक्रीमध्ये 11.4 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 3895.76 कोटींवर पोहोचली.