Fri, Jul 19, 2019 13:58होमपेज › Ankur › कथा : बुलबुल पक्ष्याचा सल्‍ला

कथा : बुलबुल पक्ष्याचा सल्‍ला

Published On: Sep 08 2018 1:35AM | Last Updated: Sep 07 2018 8:05PMएकदा एक श्रीमंत सरदाराने एका बुलबुल पक्ष्याला पकडले. त्या सुंदर पक्ष्याला पिंजर्‍यात बंद करून आपल्या हवेलीची शान वाढवायचा त्याचा विचार होता. मात्र बुलबुल पक्ष्याने सरदाराला विनंती केली. 

“मला मुक्‍त कर! त्याबदल्यात मी तुला अतिशय उपयुक्‍त सल्‍ला देईन.”

सरदाराने थोडा वेळ विचार केला व त्याने बुलबुल पक्ष्याला मुक्‍त केले. बुलबुलने मग दिलेल्या वचनाप्रमाणे  त्याला सल्‍ला दिला. 

“जे हातातून निघून गेले त्याबद्दल पश्‍चात्ताप करू नकोस आणि कोणाच्याही गोड गोड बोलण्याला भुलू नकोस.”

नंतर बुलबुल खिडकीजवळ गेला व पुढे म्हणाला,

“मला मुक्‍त करून तू चूक केली आहेस. माझ्या पंखाखाली एक हिरा होता. तो हिरा तुला मिळाला असता.”

सरदाराला पक्ष्याला मुक्‍त करण्याच्या निर्णयाचा खेद वाटू लागला. त्याने धावत जाऊन बुलबुलला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षी अतिशय हुशार होता. खिडकीतून तो बाहेर झेपावला. हवेतल्या हवेत उडत तो म्हणाला.

“तू लोभी तर आहेसच शिवाय मूर्खही आहेस. मी काही क्षणांपूर्वी दिलेला सल्‍ला तू विसरलास. हातातून निसटलेल्या मला तू पुन्हा पकडायला निघालास व माझ्या गोड बोलण्यावर चटकन विश्‍वास ठेवलास. माझ्यासारख्या सामान्य पक्ष्याच्या पंखाखाली हिरा कसा असेल याचा विचारही केला नाहीस.” असे म्हणून बुलबुल आकाशात दूर उडून गेला.