बालवीर : संदीप परमार

Published On: Jun 22 2019 1:06AM | Last Updated: Jun 21 2019 7:48PM
Responsive image


गुजरातमधील सांबरकाठा जिल्ह्यातील गुंभाकरी गाव. तप्त उन्हाळ्याचे दिवस होते. याच गावात राहणारा संदीप परमार हा 14 वर्षांचा मुलगा त्याच्या समवयस्क मित्रांबरोबर गावातील साबरमती नदीत पोहायला उतरला. सर्व मित्र पोहण्याची मजा लुटत असताना अचानक एका मगरीने तिच्या कराल जबड्यात संदीपचा उजवा पायच पकडला. मगरीचे विशाल दात त्याच्या पायाच्या हाडापर्यंत रूतले. 

संदीपच्या मित्रांनी मगरीवर दगड मारायला सुरुवात केली. संदीपनेही मगरीच्या डोक्यावर दुसर्‍या पायाने हल्ला चढवला व मगर पाय सोडेपर्यंत तिच्यावर लत्ताप्रहार करत राहिला. संदीपच्या या साहसामुळे मगरीला त्याला पाण्यात खेचून नेता आले नाही व संदीपचा जीव वाचला. संदीपला त्याच्या मित्रांनी लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पायाला झालेली जखम वगळता संदीपला फारशी दुखापत झाली नाही. मगरीच्या कराल जबड्यातूनही स्वत:ची सुटका करणार्‍या संदीपच्या साहसाला सलाम करावासा वाटतो.