Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Ahamadnagar › सुनेच्या खांद्यावरील जोखड बैलाच्या खांद्यावर

सुनेच्या खांद्यावरील जोखड बैलाच्या खांद्यावर

Published On: Jul 14 2018 8:08AM | Last Updated: Jul 13 2018 10:40PMअकोले : प्रतिनिधी

बैल घेण्याची कुवत नसल्याने सुनेला आणि मुलीला खांद्यावर जोखड घेऊन बैलासारखे काम करावे लागत असल्याची घटना अकोले तालुक्यात उघड झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसैनिक या गरीब शेतकर्‍याच्या मदतीला धावून आले आहेत. शिवसैनिकांनी या शेतकर्‍यास खिलारी जातीची बैलजोडी घेऊन दिली. त्यामुळे या शेतकर्‍याच्या मुलीच्या आणि सुनेच्या खांद्यावरील जोखड आता बैलांच्या खांद्यावर जाणार आहे. 

अंबरनाथ येथील शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी ही मदत केली. अकोले तालुक्यातील राजूर परिसरात राहणार्‍या महादू भारमल या आदिवासी शेतकर्‍याने दोन वर्षांपूर्वी आपल्या थोरल्या मुलीच्या लग्नावेळी घरची बैलजोडी विकून टाकली. शेतीमालाला बाजारभाव नाही, कायमची बेरोजगारी यामुळे महादू भारमल यांना नव्याने बैलजोडी घेणे अशक्यप्राय होऊन गेले. त्यामुळे शेतातील मशागतीसाठी महादू भारमल यांची सून कविता भारमल, मुलगी संगीता भारमल या नवदुर्गानी बैलांची जागा घेतली. या दोन्ही नणंद-भावजयी उच्च शिक्षित आहे. परंतु म्हणतात ना गरिबीला लाज नाही. त्यामुळे जग काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करीत या दोघींनी नांगर खांद्यावर घेऊन आपली शेती पिकविण्याचा निर्धार केला.

भारमल कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपल्या गरिबीला झुगारत मन घट्ट करून शेतात बैलांऐवजी आपल्या मुलींना उतरविले. या नणंद- भावजयीने देखील जोखड खांद्यावर घेऊन कोळपणीला सुरुवात केली. सात ते आठ एकर शेती असलेल्या भारमल कुटुंबाला सर्वच शेताची मशागत करणे अशक्य होते. परंतु निम्म्याहून अधिक शेताची कोळपणी कविता आणि संगीता या नणंद- भावजयीनी मार्गी लावली.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेच्या वाळेकर कुटुंबांनी ही घटना माध्यमांवर पाहिली. काळजाचा ठोका चुकविणारी ही बातमी पाहून त्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अंबरनाथच्या वाळेकर या शहरप्रमुखाने चांगल्या दर्जाची बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी या शेतकर्‍यास ही बैलजोडी देण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, चंदा गान, विभागप्रमुख प्रकाश डावरे, मिलिंद पाटील, विजय पवार, गटनेते राजू शिर्के, ईश्वर चव्हाण, पद्माकर दिघे यांनी बैलांवर गुलाल उधळत बैलांना सजविले.

अकोले पं.स.चे उपसभापती मारुती मेंगाळ यांनी मिरवणुकीसाठी खास ढोल-ताशांचे पथक बोलविले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही नवी बैलजोडी महादू भारमल या शेतकर्‍याच्या दारात नेण्यात आली. नवीन बैलजोडी पाहून भारमल कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. यावेळी अंबरनाथच्या शिवसैनिकांनी भारमल कुटुंबाला कपडे, मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी अरविंद वाळेकर म्हणाले की, शिवसेना म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे समीकरण आहे.आम्ही समाजकारण म्हणून भारमल या आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.