Fri, Apr 26, 2019 03:35होमपेज › Ahamadnagar › भर ग्रामसभेत महिलेने घेतले विष!

भर ग्रामसभेत महिलेने घेतले विष!

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:04PMनगर : प्रतिनिधी

घराच्या उतार्‍यावरून नावाची नोंद कमी केल्याने संतप्त झालेल्या महिलेने भर ग्रामसभेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरदेवळे येथे शुक्रवारी ही घटना घडली. या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. छाया बाबासाहेब जरे असे तिचे नाव आहे. कॅम्प पोलिस ठाण्यात ग्रामसेवक रामभाऊ आबूज यांच्या फिर्यादीवरून सरपंच सविता पानमळकर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याप्रकरणी छाया जरे यांच्यासह मुलगा शुभम व महेश यांच्याविरुद्ध सरकारी कामात अथडळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छाया व तिच्या नवर्‍याचे नागरदेवळे येथे घर आहे. काही वर्षांपूर्वी छाया हिचे नाव घराच्या उतार्‍यावर लावण्यात आले होते. त्यामुळे उतार्‍यावर नवर्‍यासह छाया यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. परंतु, मागील महिन्यात पती, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया यांचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छाया यांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र, न्याय न मिळाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावर कारवाई होण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीही दखल घेतली नाही. 

दरम्यान, काल (दि.25) नागरदेवळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती छाया यांना मिळाली. नाव कमी केल्याने चिडलेल्या छाया यांनी ग्रामसभेत जात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. माझ्या परस्पर उतार्‍यावरून नाव कसे कमी केले? असा सवाल करीत त्यांनी ग्रामसेवक, सरपंचाच्या अंगावर बाटलीतून शाई फेकली. त्यानंतर स्वत: विष प्राशन केले.  यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. महिला पोलिस नसल्याने उपस्थित पोलिसही हतबल झाले होते. विष घेतल्यानंतर छाया यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कॅम्प पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.