Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Ahamadnagar › महिलेस छेडल्याने रोडरोमिओेला दिला चोप 

महिलेस छेडल्याने रोडरोमिओेला दिला चोप 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी 

बेलवंडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या एका गावात महिलेची छेड काढण्यावरून दोन गटांत मंगळवारी (दि. 27) मारामारी झाली. महिलेच्या  नातेवाईकांनी रोडरोमिओला चोप देत त्याचे कपडे फाडून गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.  बुधवारी (दि.28) दुपारी पुन्हा गावच्या बसस्थानकाजवळ दोन्ही गटांत धुमश्‍चक्री सुरू झाली. त्यामुळे पुन्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शिरूर-बेलवंडी  प्रवासादरम्यान  एका रोडरोमिओने एका महिलेची छेड काढली. या छेडछाडीबाबत त्या महिलेने घरच्या मंडळीना माहिती दिली. संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी रोडरोमिओचा  शोध घेत बसस्थानकासमोर त्याला सिनेस्टाईल चोप दिला. एवढेच नाही तर  रोडरोमिओचे कपडे फाडून गावात धिंड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

दुसर्‍या दिवशी पुन्हा हा वाद उफाळून आला. काल रोडरोमिओच्या नातेवाईकांनी गावातील बसस्थानकासमोर महिलेच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांत चांगलीच धुमश्‍चक्री झाली. याबाबत बेलवंडी पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. छेडछाड प्रकरणावरुन दोन गटांत मारामारी झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत बेलवंडी पोलिस ठाण्यात  कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ म्हणाले, छेडछाड प्रकरणातून दोन गटांत मारामारी झाली असली, तरी आमच्याकडे अद्याप या संदर्भात कुठलीही फिर्याद दाखल झालेली नाही.


  •