Mon, Nov 19, 2018 23:06होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंद्याजवळ महिलेचा खून

श्रीगोंद्याजवळ महिलेचा खून

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:42AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा शहरानजीक एका 35 वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह औटेवाडी तलावात टाकून देण्यात आला. मृतदेह पाण्यात टाकताना त्याला दगड बांधण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि. 31) दुपारी चारच्या सुमारास औटेवाडी तलावात असणार्‍या एका खड्ड्यात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना याबाबत माहिती देण्यात आली. सुरुवातीला ही महिला परिसरातील असावी आणि पाय घसरून पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र या महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, मृतदेह जागचा हलेना. मृतदेहाच्या अंगाभोवती साडी गुंडाळण्यात आली होती. साडीस दगड बांधल्याने मृतदेह जड झाला होता. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असता, या महिलेच्या अंगावर एकही कपडा नव्हता. 

या महिलेच्या अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या खड्ड्यात टाकून देण्यात आला असावा. 

याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक पोवार म्हणाले, आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांकडून मिसिंग बाबत माहिती मागवली आहे. या महिलेची ओळख पटवून खुनाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

रात्री मृतदेह आणून टाकला असण्याची शक्यता 

औटेवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. बाजूच्या शेतकर्‍यांनी पाण्यासाठी रविवारी (दि. 29) तलावात खड्डा खोदला आहे. सोमवारी (दि.30) रात्री हा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा. बाजूच्या शेतकर्‍याने खड्ड्यात डोकावून पाहिले असता, त्याला पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान, तपासाच्यादृष्टीने श्रीगोंदा पोलिसांनी  ठसेतज्ज्ञ, न्यायवैद्यक विभागाच्या पथकास पाचारण केले आहे. 

साडी व पायातील जोडवे महत्त्वाचा पुरावा 

या महिलेच्या अंगावरील साडी काढून त्यात दगड बांधण्यात आले होते. काळ्या व हिरवट रंगाची ही साडी आहे. त्याचबरोबर मृत महिलेच्या पायात वजनदार जोडवे असून, या दोन गोष्टी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान या परिसरात रात्रीच्या वेळी कुणी फिरकत नाही, याची आरोपींना माहिती असावी. रात्री मृतदेह चारचाकी वाहनातून आणून या खड्ड्यात आणून टाकला असावा. चारचाकी वाहनाचे ठसे घटना स्थळी आढळून आले आहेत.