Sat, Apr 20, 2019 08:51होमपेज › Ahamadnagar › भिसेंसह कार्यकर्त्यांचे कोठडीत उपोषण 

भिसेंसह कार्यकर्त्यांचे कोठडीत उपोषण 

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 08 2018 12:24AMजामखेड : प्रतिनिधी

चौंडी येथ अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह 16 कार्यकर्त्यांनी काल (दि. 7) पासून तुरुंगातच बेमुदत उपोषण सुरू केले.

या कार्यक्रमात बहुजन एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची न्याय्य मागणी केली होती. त्यावेळी झालेल्या गोंधळास आम्ही जसे जबाबदार आहोत, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक असलेले पालकमंत्री राम शिंदेही जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, ती त्यांनी न घेतल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. भिसे यांनी केली आहे. 

सबझेलर राजेंद्र माने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मेल करून माहिती कळवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार नाईकवाडी यांनी दिले. डॉ. भिसे यांच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्याशी हिंदू धनगर सेवा संघ प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव गावडे, सुरेश कांबळे, भाजप भटके विमुक्त प्रदेश सरचिटणीस पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कोळेकर, डॉ. शिवाजी देवकाते, विलास देवकाते आदी चर्चा करीत आहेत.