होमपेज › Ahamadnagar › नगरकर गारठले; पारा 7 अंशांवर 

नगरकर गारठले; पारा 7 अंशांवर 

Published On: Jan 04 2018 5:51PM | Last Updated: Jan 04 2018 5:51PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

उत्तर महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम असून गुरुवारी सर्व ठिकाणी चांगलीच हुडहुडी जाणवली. राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद नगर येथे 7 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. यामुळे नगरकर चांगलेच गारठून गेले. तर नाशिक 9.3, जळगाव 9.4, नागपूर 8.2, मुंबई 16.4, रत्नागिरी 19, पुणे 12.1, कोल्हापूर 16.8, महाबळेश्‍वर 14, सांगली 14.7, सातारा 12.7, सोलापूर 14.9, औरंगाबाद 12, गोंदिया 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. 

दरम्यान, पुढील 24 तासांत विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या  तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे हवामान विभागाने नमूद केले. उत्तर भारतात थंडीचा कडाका सुरूच असून दिल्लीत यंदाच्या हंगामातील नीचांकी 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद गुरुवारी झाली. यामुळे दिल्लीकर अक्षरशः कुडकुडून गेले.