Mon, Nov 19, 2018 14:46होमपेज › Ahamadnagar › मेव्हण्याच्या खुनाबद्दल १० वर्षे शिक्षा

मेव्हण्याच्या खुनाबद्दल १० वर्षे शिक्षा

Published On: Jan 12 2018 1:50AM | Last Updated: Jan 11 2018 11:14PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पत्नीच्या भावाचा (मेहुण्याचा) खून केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी दादा फत्तू शेख (32, रा. कुळधरण, ता. कर्जत) यास दहा वर्षे सक्‍तमजुरी व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. 

शेख हा दि.24 सप्टेंबर 2014 रोजी रात्री 8 वाजता दारू पिऊन सासुरवाडीला गेला होता. तेथे पत्नीचा भाऊ (मेव्हणा) लतिफ इस्माईल पठाण यांच्या घरी जाऊन त्याने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी कुटुंबीयांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने हातातील सुरीने लतिफ पठाण यांच्या बरगडीजवळ वार केला व तेथून पळून गेला.

लतिफचा उपचार सुरू असतानाच दि.3 ऑक्टोबर 2014 रोजी मृत्यू झाला. तत्पूर्वी लतिफने दिलेल्या फिर्यादीवरून दादा शेख विरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या खटल्यात सरकारतर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. 

फिर्यादीची बहीण दिलशाद दादा शेख, आई बेबी पठाण, मयताची पत्नी रेश्मा लतिफ पठाण, फिर्यादीची भावजय शम्मा चाँद पठाण यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. मयताचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बन्सी बारहाते,  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा गऊणकर, डॉ. विजय जाधव, पंचनाम्यातील पंच प्रमोद घोडके, दाखल अंमलदार नरसिंग शेलार, प्राथमिक तपास करणारे हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरुंद, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पो.नि. चिंतले यांच्या साक्षीही या खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या. 

दादा शेख याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने, त्यास दहा वर्षे सक्‍तमजुरी व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडापैकी 70 हजार रुपये लतिफची पत्नी व मुलांना देण्याचा आदेश देण्यात आला आहे. सरकारतर्फे अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल डी. डी. भोसले यांनी सहाय्य केले.