Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Ahamadnagar › पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 31 2018 12:02AMटाकळी ढोकेश्‍वर : वार्ताहर

दारूच्या नशेत असलेल्या पतीने मध्यरात्री भर झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात 25 किलोचा दगड टाकून तिचा निर्घृण खून केला. पारनेर तालुक्यातील बोरवाक (खडकवाडी) येथे ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी पती पळून गेला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळसाबाई भाऊसाहेब चिकणे (वय 29 रा. बाभुळवाडा, हल्ली बोरवाक, खडकवाडी) असे खून झालेल्या महिलेचे, तर भाऊसाहेब चंदर चिकणे असे पतीचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पती भाऊसाहेब दारूच्या नशेत वारंवार मारहाण करीत असल्याने एक वर्षापासून मयत तुळसाबाई या माहेरी बोरवाक (खडकवाडी) येथे आपल्या दोन मुलांसमवेत आई-वडिलांकडेच राहत होत्या. दरम्यानच्या काळात पती भाऊसाहेब हा सासुरवाडीला येऊन पत्नीला आळेफाटा येथे घेऊन जायचे असल्याचे सांगत असे. मात्र, पत्नीने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून मंगळवारी (दि. 29) रोजी रात्री 1 ते 1:30 दरम्यान सर्व कुटुंब पटांगणात झोपलेले असताना, आरोपी भाऊसाहेब याने भर झोपेतच पत्नी तुळसाबाई यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने तुळसाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतची मयत तुळसाबाई यांचा भाऊ गंगाराम शिवाजी पारधी यांनी टाकळी ढोकेश्‍वर पोलिस दूरक्षेत्रात खबर दिली. घटनेची माहीत मिळताच काल (दि.30) सकाळी सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवाणीया, पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाढे, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, सहाय्यक निरीक्षक रोकडे, दिवटे, क्षीरसागर, संतोष शेळके, निवृत्ती साळवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रसंगी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या श्‍वानाने बोरवाक ते मांडवे घाटापर्यंत माग काढला. मात्र, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भाऊसाहेब चिकणे याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक मनिष कलवाणीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाढे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार,हवालदार संतोष शेळके, शरद पवार, निवृत्ती साळवे आदी करत आहेत.