Mon, Apr 22, 2019 16:11होमपेज › Ahamadnagar › जगताप, कोतकरांविरुद्ध दोषारोपपत्र का नाही?

जगताप, कोतकरांविरुद्ध दोषारोपपत्र का नाही?

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 11 2018 12:02AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडात अटक केलेले आरोपी आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर या दोघांविरुद्ध 90 दिवसांत तपास यंत्रणा दोषारोप ठेवू शकली नाही. त्यामुळे दोघांनाही कायदेशीर तरतुदीप्रमाणे जामीन मिळालेला आहे. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र का दाखल केले नाही, याबाबत म्हणणे सादर करावे, अशी कारणे दाखवा नोटीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सो. सु. पाटील यांनी ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांना पाठविली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील 8 जणांविरुद्ध ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी सपकाळ यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर दोषारोपपत्र दाखल केले आहे. कट रचून केडगाव येथील शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. 

मात्र, राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध सीआयडीकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांना कायदेशीर तरतुदीप्रमाणे जामीन मिळालेला आहे. हे दोघेही पोलिस कोठडीत होते. अटक झाल्यापासून 90 दिवस ते तुरुंगातच होते. तरीही त्यांच्याविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी सपकाळ यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. 

‘जगताप व कोतकर या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल का केले नाही, याबाबत लेखी म्हणणे सादर करावे’, असे कारणे दाखवा नोटिशीत नमूद करण्यात आलेले आहे. या नोटिशीची प्रत सरकारी वकील अ‍ॅड. नीलम इथापे-यादव यांनाही देण्यात आलेली आहे. आता या नोटिसांवर यात ‘सीआयडी’कडून काय म्हणणे सादर केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.