होमपेज › Ahamadnagar › मुलगी ‘नकोशी’ का ? 

मुलगी ‘नकोशी’ का ? 

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:17PM-गोरक्षनाथ शेजुळ, श्रीरामपूर

कायद्याचा आवळता फास, भरारी पथकांची नजर, सोनोग्राफी सेंटरवर होणार्‍या कारवाया, मुलींचा जन्मदरासाठीच्या योजना अशा विविध माध्यमातून जनजागृती सुरू असली, तरी श्रीगोंदा वगळता अन्य बहुतांशी तालुक्यात मुलगी अजूनही ‘नकोशी’ असल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात 2 लाख 17 हजार 791 मुले तर 1 लाख 97 हजार 865 मुलींचा जन्म झाला आहे. या कालावधीत सुमारे 20 हजार मुलींचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात हा सामाजिक प्रश्‍नही भेडसावणारा आहे.

वास्तविक, प्रत्येक एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 950 इतका असेल तर तो समाजस्वास्थासाठी चांगला मानला जातो. मात्र जिल्ह्यात श्रीगोंदा वगळता कुठेही मुलींचा जन्मदर 950 पेक्षा अधिक नसल्याची शोकांतिका आहे. मुलींचा जन्माचा दर वाढावा, या दृष्टीने महिला आणि बालविकास विभाग विविध योजना राबवत आहे. यामध्ये गर्भलिंग निदान कायद्याची कठोर अंमलबजावणी, स्त्री जन्माचे स्वागत, माझी कन्या भाग्यश्री अशा योजनांसह मुलीच्या संगोपनासह शिक्षणाकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, परंतु मुलांच्या तुलनेत मुलींकडे बघण्याची मानसिकता अद्यापतरी पूर्णपणे बदलली नसल्यानेच मुलींचा जन्मदर अजूनही अपेक्षित वाढलेला नाही.

जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका मुलींच्या जन्मदरात आघाडीवर आहे. येथे 2016 मध्ये हजार मुलांमागे 939 मुलींचा जन्म होता तर 2017 मध्ये हजार मुलांमागे तब्बल 1007 मुली जन्माला आल्याने येथे खर्‍यापद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत झाले आहे. अहमनगर शहर आणि तालुक्यात गेल्यावर्षी 2017 मध्ये दरहजारी मुलांमागे 892 मुली जन्माला आल्या आहेत. तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2018 पर्यंत हे प्रमाण 832 असे चिंताजनक आहे. 2016 मध्ये दरहजारी 738 मुली असलेल्या जामखेडमध्ये 2017 मध्ये 839 अशी वाढ झाली आहे. तर मार्च 2018 अखेरच्या तीन महिन्यात एक हजार मुलांमागे 993 मुली अशी समाधानकारक प्रगती आहे.

पकर्जतमध्ये 2016 ला 850 मुलींचा जन्मदर होता तर 2017 ला पुन्हा घटून तो 821 वर आला आहे. तसेच अखेरच्या तीन महिन्यात हे प्रमाण 914 असे काहीसे वाढते असल्याचे चित्र आहे. नेवासा तालुक्यात 2016 मध्ये 934 तर 2017 मध्ये 925 असे कमीअधिक प्रमाणात मुलींचा जन्मदर दर्शवणारे गुणोत्तर आहे. मार्च 2018 पर्यंत 940 अशी दिलासादायक प्रगती पहायला मिळत आहे. पारनेरात 2016 मध्ये 898 तर 2017 ला 907 असा काहीसा वाढता आलेख आहे.

मार्च 2018 अखेर दरहजार मुलांमागे 951 मुली अशी चांगली प्रगती आहे.पाथर्डी तालुक्यात 2016 मध्ये 873 तर 2017 मध्ये 929 असा दिलासायक मुलींचा जन्मदर आहे. तर मार्च 2018 पर्यंत्तच्या तीन महिन्यात 915 अशी अपेक्षा वाढवणारी आकडेवारी आहे. शेवगावमध्ये 2016 ला 952 तर 2017 मध्ये काहीशी घसरताना 933 इतका आहे. गेल्या तीन महिन्यात 937 असे बर्‍यापैकी दरहजारी गुणोत्तर आहे. दक्षिणेतील तालुक्यात मुलींचा जन्मदर हा सरासरी हजारामागे 900 असा आहे. मात्र हे प्रमाण 950 पेक्षा अधिक होणेही तितकेच गरजेचे आहे.

अकोलेसारख्या आदिवासी भागातही मुलींचा जन्मदर वाढत आहे. कोपरगावात काहीशी घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. राहाता तालुक्यात वाढणारा मुलींचा जन्मदर अपेक्षा वाढवणारा आहे. राहुरीतही मुलींचा वाढता जन्मदर इतरासाठी आदर्शवत बनू पाहत आहे. संगमनेरात मुलींचा जन्मदर प्रशासकीय यंत्रणेला जागे करणारा आहे. तर श्रीरामपुरातील मुलींचा घटता जन्मदर राजकीय उदासिनता आणि प्रशासकीय यंत्रणेचा निरुत्साह दर्शवणारा आहे.

अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाव्दारे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायती आणि महापालिकाच्या मिळालेल्या संयुक्त अहवालातून 2013, 2014  मध्ये जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा 917 होता. 2015 मध्ये 905, 2016 मध्ये दरहजारी मुलांमागे 895 अशी काहीशी त्यात घट झाली. त्यानंतर गेल्यावर्षी 2017 मध्ये हे प्रमाण 904 असे आशादायी आहे. तर चालू 2018 मध्ये मार्चअखेरच्या तीन महिन्यात मुलांची संख्या 13 हजार 197 तर मुली 11 हजार 931 अशी 904 आहे. यातून प्रशासनाची कामगिरी काहीप्रमाणात समाधानकारक असली तरी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी अजुनही त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.