होमपेज › Ahamadnagar › कोपरगावात मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

कोपरगावात मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:14PM- महेश जोशी, कोपरगाव

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहेत. सामाजिक संघटनांचा त्याला हातभार लागत आहे. तरी देखील मुलींचा जन्मदर काही वाढला नाही. कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही. हजार पुरुषामागे किमान 950 मुलींचे प्रमाण गरजेचे असताना कोपरगाव तालुक्यात मात्र हे प्रमाण गेल्यावर्षी केवळ 884 असल्याचे चिंताजनक दृश्य समोर आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर्षी चांगले काम सुरु केल्याने सन 2018 मध्ये तीन महिन्यात हे प्रमाण दरहजार मुलांमागे 971 मुली असे आशादायी आहे. असेच काम सुरु राहिल्यास यावर्षीच कोपरगावात मुलींचा जन्मदर वाढेल, अन्यथा पुन्हा एकदा येथे प्रशासनाची निष्क्रीयता चव्हाट्यावर येईल. 

सन 2013 मध्ये (2361 मुले), (2084 मुली), गुणोत्तर हजारात प्रमाण 883 (मुली) असे आहे. सन 2014 (2361 मुले) (2084 मुली) (883), 2015 मध्ये (2213 मुले) (1992 मुली), (900), 2016 मध्ये (1853 मुले) (1767 मुली) (954), असे समाधानकारक गुणोत्तर होते. मात्र गेल्या वर्षी 2017 मध्ये 1636 मुले व 1447 मुलींचा जन्म झाल्याने दरहजारी मुलांमागे 884 मुलींचा जन्म होवून पुन्हा एकदा कोपरगावात मुलींचा जन्मदर घसरल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले होते. 

कोपरगाव तालुक्यात शहरात ग्रामिण रुग्णालय तर संवत्सर, चासनळी, दहेगाव बोलका, वारी, पोहेगाव आणि टाकळी-ब्राम्हणगाव अशी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तर त्या अंतर्गत बत्तीस आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. अशा एकूण एकोणचाळीस आरोग्य केंद्रात मात्र कर्मचार्‍यांचा वाणवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एक्कावन पदे रिक्त आहेत. ग्रामिण रूग्णालयात देखील तीच परिस्थिती आहे. ही पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर दोन-दोन ठिकाणी काम करण्याचा ताण पडत आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाने  विविध योजनांमधून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी परिश्रम सुरु केले आहेत.  पंतप्रधान मातृत्व योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यात दर महिन्यांच्या 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी केली जाते.

त्यांच्यावर पूर्णपणे त्या बाळंत होईपर्यंत लक्ष ठेवले जाते त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने जेथे जेथे मोफत गर्भलिंग तपासणी केंद्र आहे, तेथे या गरोदर मातांना बाळाच्या सुरक्षीत वाढीसाठी तपासणीसाठी पाठविले जाते, याशिवाय अन्यप्रकारे समाजात जनजागृती करण्याचे काम अपेक्षित आहे. मात्र सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी हे फक्त देखाव्यापुरतेच बेटी बचाओ-बेटी पढाओ संदेशाचे जनजागृतीकरण करतात.

स्वाध्याय परिवाराच्या धनश्री तळवळकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी स्त्री भू्रुणहत्या करुनका याबाबत स्वाध्यायी बंधु-भगिनींच्या माध्यमातून पथनाट्ये करुन ग्रामिण भागात त्याची जनजागृती चांगल्या प्रकारे केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून 2017 मध्ये मुलींचा जन्मदर चिंताजनक घटल्यानंतर चालूवर्षी जानेवारी ते मार्च 2018 या तीन महिन्यात कोपरगाव तालुक्यात 690 मुले तर 670 मुली जन्माला येवून मुलींचा जन्मदर 971 असा आशादायी झाला आहे. वर्षभर ही जनजागृती सुरु राहिली तर नक्कीच कोपरगावात मुलींचा जन्मदर हा मुलांच्या जन्मादराशी समान किंवा त्यापेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, आज मुलगाच हवा हा हट्ट सुटत नाही. आज डिजीटलायझेशन जोरात सुरू आहे. व्हॉटस-अ‍ॅपवर असंख्य संदेशाचे अदान-प्रदान सुरू असतानाही मुलींचा जन्मदर का वाढत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे.  परिणामी मुलं-मुली अविवाहीत राहण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. उच्च शिक्षण घेवूनही अनेकांची लग्नच जुळत नाही. वधु-वर संशोधनांचे मेळावे प्रत्येक ठिकाणी पार पडतात पण त्यात इच्छुक मुलांची संख्या 400 ते 500 च्या पुढे असते मात्र त्या प्रमाणात मुली अवघ्या 10 ते पंधराच असतात, ही परिस्थिीती बदलण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

केवळ घोषणा, कागद पोस्टर, बॅनरबाजी करुन स्त्री भू्रणहत्या थांबत नाही.  तालुक्यातील असंख्य महिला या अहमदनगर, नाशिक, येवला, वैजापूर, मनमाड सह आजुबाजुच्या परिसरात जाऊन गर्भलिंग निदान चाचणीसाठी मोठी रक्कम मोजतात. त्यामुळे अशा स्त्री भू्र्रणहत्या थांबणार कधी ?   ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याऐवजी वाढतील त्यातून सामाजिक शांततेचा र्‍हास होईल आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, परिणामी, मुलींच्या जन्माबाबत पुन्हा उदासिनता येईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.