Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Ahamadnagar › अनुदानासाठी सरकारचे पाय धरणार नाही 

अनुदानासाठी सरकारचे पाय धरणार नाही 

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 13 2018 11:42PMनेवासा : प्रतिनिधी

चार-चार राष्ट्रपती सन्मान करतात, गेली 47 वर्षे मी अनाथांना निवारा देण्याचे काम करते, माझे काम खरे की खोटे हे सरकारला कळत नाही का, परंतु सरकार मात्र माझ्या संस्थेला अनुदान देण्यात उदासीनता दाखवत असल्याची खंत आहे. परंतु मी सरकारची मनधरणी करावी, त्यांच्या व्यासपीठावर जाऊन भाषण द्यावे, अनुदानासाठी त्यांचे पाय धरावेत, तर हे कदापी होणार नसून, माझ्या पाठीशी असणारी जनता हेच माझे सरकार असल्याने मी स्वतः कधीच सरकार दरबारी अनुदानासाठी जाणार नसल्याचे अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी सांगीतले.शहरात एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्वत:वर ओढावलेल्या कठीण प्रसंगामधून सावरत जगलेल्या खडतर आयुष्याची कहाणी सांगतानाच त्यामधूनच समाजातील अनाथांचा अधार होण्याची इच्छा निर्माण झाल्याने आजचे एवढे मोठे समाज सेवेचे काम उभे असल्याचे सांगीतले. 

त्या म्हणाल्या, ज्यावेळी देशाचा राष्ट्रपती मी चौदाशे अनाथ मुलांची माय असल्याचे जाहीर पणे सांगतात, विविध साडेसातशे पुरस्कारांनी मला गौरवले जाते. परंतु हे सरकारला खरेच कळत नाही का. काही दिवसांपूर्वी माझ्या संस्थेला मान्यता देताना समाजकल्याण विभागाने माझ्याकडून लिहून घेतले की, मी सरकारकडे अनुदान मागणार नाही, तर मी पण लिहून दिले की जा मी नाही मागणार तुम्हाला अनुदान. माझ्याबरोबर माझा समाज आहे, मी जे मागायचे ते समाजाला मागेल. पण सरकारकडे जाणार नाही. आजपर्यंत जे चालवले ते समाजाच्या पाठबळावरच चालवले आहे. मी अनुदानासाठी मंत्र्यांच्या व्यासपीठावर जाणार नाही. एकाच्या व्यापीठावर गेले अन् भाषण केले, तर दुसर्‍याला पण तेच वाटत असते. नाही तर राग येतो, विरोधक तयार होतात. अन राजकाराण्यांना राग आला तर माझा व माझ्या अनाथ मुलांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे मला समाजसेवा करायची आहे. 

त्यामुळे मी कोणाच्याही व्यासपीठावर जाणार नाही, असे ठणकावून सांगीतले. समाजात आज एखादी दुर्दैवी घटना घडली, तर मंत्री मोठे सरंक्षण घेऊन तेथे जातो. परंतु पत्रकार व पोलिस मात्र जिवाची बाजी लावत समाजासाठी तेथे झगडत असतो, ती ही एक प्रकारची समाजसेवाच आहे.दुपारी नेवासा पोलिस ठाण्यात सिंधूताई सपकाळ यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी त्यांचा पोलिस निरिक्षक प्रविण लोखंडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किरण शिंदे, बाबा लबडे, संदीप दिवटे, तुळशीराम गिते, पोलिस हवालदार कानडे, भरत घुगे, सतिष देसाई, बुचकूल, महिला पोलिस कर्मचारी कल्पना गावडे, मनीषा धाने या उपस्थित होते.