Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Ahamadnagar › प्रभागातील नगरसेवकांचीही होणार चौकशी

प्रभागातील नगरसेवकांचीही होणार चौकशी

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:16AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील आरोपी भरत काळे याच्याविरुद्ध काल (दि. 27) न्यायालयात पावणेदोनशे पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध ‘केडीएमसी’ प्रणालीत बोगस कामांची नोंद घेणे, घोटाळ्यातील फायली गायब करण्यास सहकार्य केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, वादग्रस्त पथदिव्यांची कामे मंजूर झालेल्या प्रभाग क्र. 1 व 28 मधील नगरसेवकांचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.

महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामांत 34 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी 29 जानेवारी रोजी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 120 ब, 201, 406, 409, 420, 467, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी विद्युत विभागातील लिपिक भरत काळेला याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी ठेकेदार सचिन लोटके, 21 मार्च रोजी विद्युत विभागातील पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे व 8 मार्च रोजी तपास निष्पन्न झालेल्या प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना अटक करण्यात आली. घोटाळ्याचा सूत्रधार रोहिदास सातपुते हा अजूनही फरार आहे. अटक केलेल्या पाच जणांपैकी दराडे व झिरपे यांना जामीन मंजूर झालेला आहे. इतर तीन जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.

शनिवारी (दि. 28) आरोपी भरत काळे याला अटक करून 90 दिवस पूर्ण होत आहेत. वेळेत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास त्याचा फायदा होऊन आरोपीला जामीन मिळाला असता. त्यामुळे पोलिसांनी 89 व्या दिवशी भरत काळे या एका आरोपीविरुद्ध दोषरोपपत्र दाखल केले आहे. पावणेदोनशे पानांच्या दोषारोपपत्रात पोलिसांनी केलेला प्राथमिक चौकशी अहवाल, आरोपी भरत काळे याच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीचे पुरावे, कामे झालेल्या ठिकाणांचे पाहणी अहवाल, घरझडती पंचनाम्यांचा दोषारोपपत्रात समावेश करण्यात आलेला आहे. काळे याने विद्युत विभागाऐवजी बांधकाम विभागातून कामांच्या ‘केडीएमसी’वर नोंदी केलेल्या आहेत. इतर आरोपींबाबत चौकशी सुरू असून, चौकशी केल्यानंतर त्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच आरोपींची संख्याही वाढू शकते.

गुन्हा दाखल झाल्यापासून घोटाळ्याचा सूत्रधार रोहिदास सातपुते हा फरार आहे. त्याच्या संपत्तीचा तपशील पोलिसांना संकलित केलेला आहे. त्याला फरार घोषित करून मालमत्तेवर टाच आणण्यासाठीचा अर्ज 2 मे रोजी पोलिसांकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे, असे पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 1 व 28 मधील नगरसेवकांची यादी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे मागितलेली आहे. ती यादी आल्यानंतर संबंधित प्रभागातील नगरसेवकांना लेखी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यांचा दोष आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.