Wed, Mar 20, 2019 03:19होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात 9 लाख कुटुंबांना  तूर डाळीची प्रतिक्षा कायम!

जिल्ह्यात 9 लाख कुटुंबांना  तूर डाळीची प्रतिक्षा कायम!

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:25PMनगर  :  प्रतिनिधी

गोरगरिब जनतेला बाजारभावापेक्षा कमी दरात तूरडाळ उपलब्ध करण्याची घोषणा शासनाने केली. ही घोषणा करुन सहा महिने उलटले. परंतु अद्यापि ही डाळ रेशन दुकानांत उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यातील फक्‍त 60 हजार कुटुंबात  ही डाळ शिजली गेली आहे. अद्यापि जवळपास नऊ लाख कुटुंबांना ही डाळ दिसली नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी तूरडाळीचे उत्पन्‍न कमी झाले होते. त्यामुळे या डाळीने गगणाला गवसणी घातली होती. वाढत्या दरामुळे गोरगरिब जनतेच्या घरात ही डाळ दिसणे दुर्मिळ झाले होते. शासनाने या गोरगरिब जनतेला दिलासा देण्यासाठी रेशन दुकानांत  स्वस्त दरात डाळ उपलब्ध केली होती. यंदा डाळीचे उत्पन्‍न देखील वाढले आहे. तूरडाळ उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाने डाळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खरेदी केलेली डाळ प्रतिकिलो 55 रुपयांनी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी रेशन दुकानांतून ती विकली जाणार आहे.

हवी तेवढी आणि सर्वांनाच ही डाळ दिली जाणार आहे. प्रारंभी फक्‍त एक किलो डाळ उपलब्ध केली जाणार आहे. जिल्ह्यासाठी किती डाळ आवश्यक आहे.याचा प्रस्ताव शासनाने मागविला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने फक्‍त साडेतीन हजार क्‍विटल टाळीची मागणी केली. शासनाने नियुक्‍त केलेल्या ठेकेदाराने आतापर्यंत फक्‍त 600 क्‍विंटल डाळ उपलब्ध केली आहे. ही डाळ श्रीरामपूर, पाथर्डी, नगर शहर व नगर तालुक्यांतील गोरगरिब जनतेला दिली गेली. आतापर्यंत जिल्ह्यातील फक्‍त 60 हजार शिधापत्रिकाधारकांच्या घरात ही डाळ शिजली गेली आहे. एकीकडे सर्वच स्तरातील जनतेला 55 रुपये दराने हवी तेवढी डाळ देण्याची घोषणा शासनाने केली आहे. घोषणेचा जागर केला गेला. परंतु या घोषणेची अंमलबजावणी करण्याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

तूरडाळीबाबत  जनताच अनभिज्ञ

शासनाने स्वस्तधान्य दुकानांत 55 रुपये दराने तूरडाळ उपलब्ध केली असल्याची माहितीच खेड्यापाड्यांतील गोरगरिब जनतेला नाही. डाळ किती लागेल,याची माहिती पाठविण्याचे निर्देश प्रशासनाने स्वस्तधान्य दुकानदारांना दिले होते. त्यांनी मात्र जनतेला न विचारता कमी आकडेवारी सांगितली आहे. तूरडाळ रेशनवर उपलब्ध असल्याचा जागर आता ग्रामसभेत करण्याची गरज आहे. गावागावांतील जनतेला याबाबत माहिती झाल्यास तूरडाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे.