Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Ahamadnagar › शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

Published On: Jun 25 2018 1:44AM | Last Updated: Jun 24 2018 11:39PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीतील 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. पोलिस बंदोबस्तात मतदान अधिकारी व कर्मचारी  मतदान साहित्य घेवून मतदान केंद्रावर मुक्‍कामी रवाना झाले आहेत.गडबड, घोटाळा होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडिओ कॅमेर्‍याचा वॉच राहाणार आहे.  

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरात 13 हजार 439 मतदार आहेत. या मतदारांना मतदानाचा हक्‍क बजाविण्यासाठी जिल्हयात 20 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसघांसाठी आज (दि.25) मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी दोनशे अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. या अधिकार्‍यांना काल (दि.24) नगर येथील महासैनिकी लॉन येथे सकाळी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे व तहसिलदार सुधीर पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणानंतर मतपेट्या, मतपत्रिका व अनुषंगिक इतर मतदान साहित्य ताब्यात घेवून मतदान अधिकारी व कर्मचारी कडक पोलिस बंदोबस्तात  आपापल्या मतदान केंद्रांवर मुक्‍कामी रवाना झाले आहेत. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्षपदी राजपत्रित व वरिष्ठ अधिकारी यांची तर मतदान अधिकारी पदी वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान, मोबाईल फोन, कॅमेरा आदी वापरांवर प्रतिबंध केला असून, मतदानाच्या गोपनियतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत संबंधित मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओचित्रीकरण करण्यात येणार असून, मतदारांनी मतदान कक्षामध्ये गैरप्रकार करु नयेत. तसेच मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग करु नये, यासाठी प्रत्येक  मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी  भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रशासन व राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकार्‍यांची  सुक्ष्म निरीक्षकपदी नियुक्‍ती केली आहे. मतदान गोपनीयतेचा भंग झाल्यास, संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश या अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

मतदान केंद्रावर आठ जणांची नियुक्‍ती

मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई व एक हत्यारी पोलिस व एक व्हिडिओ कॅमेरामन असणार आहे. मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर एक फौजदार व पाच पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तीन फूट लांबीची गुलाबी मतपत्रिका

या निवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने, मतदानासाठी वापरण्यात येणारी मतपत्रिका ही तीन फूट लांबीची आहे. या गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेत सर्वात शेवटी ‘नोटा’चा रकाना असणार आहे. मतपत्रिकेत सर्वात प्रथम अनिकेत पाटील व सर्वात शेवटी संदीप बेडसे या उमेदवारांचे नाव व छायाचित्र आहे.