Sat, Jul 20, 2019 03:00होमपेज › Ahamadnagar › अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले

अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 11:40PM

बुकमार्क करा
ब्राह्मणवाडा : वार्ताहर

निधी उपलब्ध होऊनही अकोले तालुक्यातील कोतूळ येथील मुळा नदीवरील पुलाचे काम लवकर सुरू  होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाच्या दोन अधिकार्‍यांना काल येथील सोसायटीच्या कार्यालयातच सुमारे तीन तास कोंडून आपला संताप व्यक्त केला.  कोतूळ परिसरात पर्यायी पुलाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन जलसंपदा विभागाने पिंपळगांव खांड धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीला दिले होते. मात्र, काम का सुरू होत नाही? याबाबत ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले. याबाबत चर्चा करण्यासाठी अधिकार्‍यांना काल कोतूळ येथे बोलविले. मात्र, पुलाच्या कामाला निधी येऊन पडला, तरी काम सुरु होत नाही. याबाबत अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तरातून संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सोसायटी कार्यालयातच कोंडून निषेध व्यक्त केला. 

अकोले तालुक्यातील मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळगांव खांड धरणात तीन वर्षांपासून पावसाळ्यात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुना कमी उंचीचा पूल वर्षांतून तब्बल सात महिने पाण्याखाली असतो. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी दूरच्या आणि खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो. कोतूळ व परिसरातील तब्बल 40 गावांचा संपर्क या पुलामुळे विस्कळीत झाला आहे. दरम्यान, नवीन पुलासाठी धरणाच्या सुधारित मान्यतेत बुडित पुलासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र पुलाचे काम सुरु होत नसल्याने ग्रामस्थांनी काल अचानक दोन अधिकार्‍यांना कोंडले. तसेच पुलाचे काम लवकर सुरु करावे, यासाठी कोतूळ ग्रामस्थांनी बाजारपेठा बंद ठेवून जोरदार मागणी केली. याशिवाय पिंपळगांव खांड धरणातील पाणी सोडून देवून मुळा नदीवरील कोतूळ जवळील जूना पुल वाहतुकीसाठी मोकळा करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली मात्र त्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. याबाबत बैठक घेवून चर्चा करू तसेच नवीन पुलाची दीड महिन्यांत निवेदा काढू, असे लेखी आश्वासन अकोलेतील शाखा अभियंता रामनाथ आरोटे आणि संगमनेर येथील कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी दिले. या नंतर ग्रामस्थानी या अधिकार्‍यांना मुक्त केले.