Thu, Apr 25, 2019 14:18होमपेज › Ahamadnagar › लाभार्थींना मिळेना बिलाप्रमाणे धान्य

लाभार्थींना मिळेना बिलाप्रमाणे धान्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाळकी : वार्ताहर

अंत्योदय कार्डधारकांना महिन्याकाठी 35 किलो धान्य स्वस्तधान्य दुकानात मिळत होते. मात्र आता लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत ते 10 किलोपर्यंतच दिले जात आहे. तसेच पॉस मशिनमधून 35 किलो धान्य दिल्याची पावती येते. त्यात दुकानदार पेनने खाडाखोड करून 10 किलो धान्याचे बिल देत आहेत. त्यामुळे लाभार्थी व धान्य दुकानदारांत वादावादी होत असून, दुकानदारच पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी करण्याचा सल्ला या लाभार्थींना देत आहेत.

अंत्योदय कार्डधारकांसाठी महिन्याकाठी 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, असे 35 किलो धान्य स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येते. मात्र अंत्योदय कार्डमध्ये लाभार्थ्यांची संख्या एक किंवा दोन असल्यास, अशा कार्डधारकांच्या 35 किलो मिळणार्‍या धान्याला राज्य सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. लाभार्थ्यांना आता फक्त 10 किलो धान्याचे वाटप केली जात आहे. त्यात 6 किलो गहू व 4 किलो तांदूळ देण्यात येत आहे. साखरेचे दर 15 रुपयांवरून 20 रुपयांवर गेला आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे धान्य कमी झाले आहे, त्यांना साखरही दिली जात नाही. महिन्यासाठी मिळणार्‍या दहा किलो धान्यामध्ये कशी गुजराण करावी, हा प्रश्‍न लाभधारकांपुढे निर्माण झाला आहे.

अंत्योदय कार्डधारकांत अल्पभूधारक, भूमिहीन व निराधार व्यक्तींचा समावेश आहे. महिन्याकाठी स्वस्त दरात मिळणार्‍या 35 किलो धान्यावर ते कशीबशी गुजराण करतात. मात्र शासनाने याच धान्यावर टाच आणली आहे. सध्या नगर तालुक्यात सर्वत्र रेशनचे धान्य वितरण सुरू आहे. लाभार्थी सकाळपासून धान्यासाठी रांगेत उभे राहात आहेत. मात्र दिवसभर रांगेत उभे राहूनही फक्त 10 किलो धान्य मिळत आहे. मात्र लाभधारकांना पॉस मिशनमधून 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, 1 किलो साखर, असे बिल दिले जाते. त्याचे एकूण 104 रुपये आकारले जातात. मात्र धान्य दुकानदार बिलात खाडाखोड करून 6 किलो गहू, 4 किलो तांदूळ, असे फक्त 10 किलोच धान्य वाटप होत आहे. त्यामुळे शासनाने धान्य कमी केले, तर पॉस मिशनमधून तेवढेच बिल का दिले जात नाही, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे गोरगरिबांचे धान्य परस्पर कमी करून धान्य दुकानदार धान्यांचा काळाबाजार करत असल्याचा आरोप लाभधारक करत आहेत.

पुढील महिन्यात कोट्याप्रमाणे बिल देऊ : बोठे

शासनाने अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्याच्या शिधापत्रिकेमध्ये ज्या लाभार्थ्याची संख्या एक किंवा दोन आहे, अशा लाभधारकांच्या धान्यसाठ्यात कपात केली आहे. त्यामुळे जेवढ्या धान्याचा पुरवठा झाला, तेवढ्याच धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र पॉसमधून मिळणारे बिल पूर्वीच्या कोट्याप्रमाणेच मिळत आहे. पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांना ज्या प्रमाणात धान्य दिले जाईल, तेवढेच बिले देण्यात येतील, असे धान्य वितरक भाऊसाहेब बोठे यांनी सांगितले.