Sat, Dec 15, 2018 20:34होमपेज › Ahamadnagar › केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती स्थिर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती स्थिर

Published On: Dec 07 2018 1:03PM | Last Updated: Dec 07 2018 5:07PM
राहुरी : प्रतिनिधी 

महात्‍मा फुले कृषी विद्‍यापीठाच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आली. त्‍यामुळे उपस्‍थितांचा एकच गोंधळ उडाला. पदवीदान समारंभात राज्‍यपाल सी. विद्‍यासागर राव, पालकमंत्री राम शिंदे उपस्‍थित होते. त्‍याचबरोबर कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथ देखील उपस्‍थित होते. गडगरींना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी गडकरी आले होते. राज्‍यपाल विद्‍यासागर राव यांनी उपस्‍थित विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्‍यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाषणासाठी उभे राहिले. साधारणपणे अर्धा तास 'देशातील कृषी व्‍यवस्‍था' या विषयावर ते बोलले. आपले भाषण आटोपल्‍यानंतर विद्‍यासागर राव भाषणासाठी उभे राहले. त्‍याचवेळी गडकरी खुर्चीवर बसताना त्‍यांना भोवळ आली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तातडीने डॉक्‍टरांना पाचारण करण्‍यात आले. डॉक्टरांनी गडकरी यांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्‍णवाहिकेतून रुग्णालयात नेण्‍यात आले. डॉक्टरांनी गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 

''श्वास घेण्यास त्रास झाला आणि मला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर शुगर आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली. आता मला बरे वाटत असून काळजी करण्याचे कारण नाही,'' असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.