Tue, Jul 23, 2019 02:26होमपेज › Ahamadnagar › उकळत्या पाकात पडून  कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

उकळत्या पाकात पडून  कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Published On: Dec 02 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 1:03AM

बुकमार्क करा

जामखेड/नान्नज : प्रतिनिधी  

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् कारखान्यात मिक्सरच्या टाकीतील उकळत्या पाकात पडून एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.30) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. हा तरुण पंधरा दिवसांपूर्वीच येथे कामाला लागला होता.

विनोद अंकुश मोरे (19, रा. गांधनवाडी, ता.पाटोदा जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत विनोद मोरे हा परांडा तालुक्यातील चिंचपूर या ठिकाणी आपल्या बहिणीकडे राहत होता. त्याचे आई-वडील मुंबई येथे राहत असून, त्याचे मेव्हणे शिवाजी झांबरे हे हळगाव येथील जय श्रीराम शुगर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड या कारखान्यात नोकरीस आहेत. त्यामुळे विनोद हा देखील पंधरा दिवसांपूर्वी रोजीरोटीसाठी दि. 12 नोव्हेंबर रोजी या कारखान्यात उत्पादन विभागात हेल्पर म्हणून कामाला लागला होता.

विनोद हा गुरूवारी (दि.30) रात्रपाळीला काम करीत होता. रात्री दीडच्या सुमारास तो तळमजल्यावरअसलेल्या उकळत्या साखरेच्या पाकाशेजारी (सेन्ट्रीफ्युगन टब) एकटाच काम करीत होता. तर त्याचे बाकीचे सहकारी वरच्या मजल्यावर दुरूस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी विनोद हा उकळत्या पाकाच्या टबमध्ये पडला. याचा आवाज वरच्या मजल्यावरील कामगारांना आल्याने, त्यांनी ताबडतोब मशिनरी बंद केली व टबमध्ये पडलेल्या विनोदला बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या विनोदला तातडीने जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. 

घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचल्या. या वेळी कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एसआरपी पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. 

पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मृत विनोदचा मेव्हणा शिवाजी झांबरे याने ताबडतोब त्याच्या आई-वडिलांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. ते काल (दि.1) सकाळी दहा वाजता जामखेडला आले. 

कारखान्याचे कार्यकारी संचालक निंबे व मॅनेजर एस. जे. गाढवे यांनी विनोद याच्या नातेवाईकांशी चर्चा करून, त्याच्या आई-वडिलांना कारखान्याकडून 15 लाखांची मदत देण्याचे यावेळी जाहीर केले. या घटनेबाबत जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल दुपारी शवविच्छेदन करून विनोदवर गांधनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.