Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Ahamadnagar › अ‍ॅट्रॉसिटी तील बदलास विरोध

अ‍ॅट्रॉसिटी तील बदलास विरोध

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 24 2018 12:21AMनगर  : प्रतिनिधी

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार केला जावा, या मागणीसाठी तथागत प्रतिष्ठानच्या दलित कार्यकर्त्यांनी नग्नावस्थेत गळ्यात मडके अडकवून व कंबरेच्या मागे खराटा बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.  देशभरात समता प्रस्थापित होण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील जनतेच्या सुरक्षेसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तयार केला गेला आहे. हा कायदा असताना देखील खैरलांजी, सोनई हत्याकांड, नितीन आगे प्रकरण, सागर शेजवळ  खून प्रकरण आदी प्रकार घडले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यात काही बदल केले आहेत. या बदलामुळे दलितांना मिळालेले सुरक्षा कवचच धोक्यात आले असल्याने तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या बदलामुळे जातीयवादी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढतील. स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांवर झालेल्या अत्याचाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले.

अ‍ॅट्रॉसिटीची सर्वच प्रकरणे खोटी नसतात. राज्यासह देशात वीस वर्षात किती अ‍ॅट्रॉसिटीच्या  केसेस झाल्या आणि यामध्ये किती खोटे व किती खरे प्रकरणे आहेतच याची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली. या आंदोलनात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत म्हस्के, आशिष गायकवाड, सुशील म्हस्के, तेजस गायकवाड, विनोद पाडळे, दिपक गायकवाड, हर्षद पेंढारकरआदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
 

 

tags : nager,news,Under the Atrocity Act resistance to change