Mon, May 27, 2019 09:54होमपेज › Ahamadnagar › लोकसभेसाठी अत्याधुनिक ईव्हीएम

लोकसभेसाठी अत्याधुनिक ईव्हीएम

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 10:17PMनगर : प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, मतदार यादी बिनचूक करणे तसेच मतदान यंत्रांची जुळवाजुळव आदीसाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक मतदान यंत्रे आणण्यासाठी महसूल व पोलिस यांचे संयुक्‍त हत्यारी पथक बेंगलोरला रवाना झाले आहे.

येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला जाणार आहे. नगर जिल्ह्यात कोपरगाव व दक्षिण नगर असे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत 3 हजार 722 मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्रांवरच मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मतदान यंत्रांची जुळवाजुळव सुरु आहे.  आजमितीस जिल्हा प्रशासनाकडे सन 2006 पूर्वीची एम-1 प्रकारची 5 हजार मतदान यंत्रे उपलब्ध आहेत.  सन 2006 ते 2017 या कालावधीची एम-2 प्रकारची यंत्रे उपलब्ध नाहीत. 

आयोगाने बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अत्याधुनिक मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी नवीन एम-3 प्रकारचे ईव्हीएम उपलब्ध होणार आहेत. सदर यंत्रे आणण्यासाठी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रवाना झाले आहे. यामध्ये नायब तहसीलदार जयसिंग भैसाडे, अव्वल कारकून विजय धोत्रे व प्रसाद गर्जे यांच्यासह आठ हत्यारी पोलिस यांचा समावेश आहे.  एम-3 प्रकारचे 8 हजार 20 बॅलेट युनिट (बीयू) तर 4 हजार 600 कंट्रोल युनिट (सीयू) बंगलोरमधून बुधवारी उशिरा नगरमध्ये दाखल होणार असल्याचे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी  अरूण आनंदकर यांनी सांगितले.

24 तास पोलिसांची टेहाळणी

बेंगलोरहून आलेले मतदान यंत्रे केडगाव येथील गोदामात ठेवली जाणार आहेत. त्यासाठी या गोदामाची डागडुगी सुरु आहे. या गोदामात मतदान यंत्रे ठेवली गेल्यानंतर या गोदामाभोवती व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. या गोदामाला 24 तास एक पोलिस अधिकारी व तीन सशस्त्र पोलिसांचा पाहारा असणार आहे.