Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Ahamadnagar › जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरण : मुख्य आरोपी गायकवाड अटकेत

जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरण : मुख्य आरोपी गायकवाड अटकेत

Published On: May 03 2018 2:38PM | Last Updated: May 03 2018 2:38PMनगर : प्रतिनिधी

जामखेड शहरात 28 एप्रिल रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस व जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जामखेड शहरात 28 एप्रिल रोजी सायंकाळी योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड  (22, रा. तेलंगसी, ता. जामखेड, हल्ली शिवशंकर तालीम, जामखेड) हा फरार होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सायबर शाखा व जामखेड पोलिसांना आरोपी हा मांडवगण फाटा (ता. शिरूर, जि.पुणे) याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिन्ही पथकांनी  बुधवारी (दि. 2) मध्यरात्री मुख्य आरोपी गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, सहायक शरद गोर्डे, कैलास देशमाने, उपनिरीक्षक सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे आदींचा समावेश होता.

जामखेड हत्याकांड हे दीड वर्षांपूर्वीच्या वादातून घडल्याचे समोर येत आहे. दीड वर्षांपूर्वी एका वयस्कर व्यक्तीवर गाडी चालविताना गायकवाड याच्याकडून पाणी उडाले होते. त्यात कपडे खराब झाल्याने त्यावरून वाद निर्माण झाला. ही बाब संबंधित वृद्धाने मयत योगेश राळेभात यास सांगितली होती. त्यावरून राळेभात याने गायकवाड यास तालमीत जाऊन मारहाण केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंत समझोता झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतरही सातत्याने दोन्ही गटांमध्ये एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी, टोचून बोलणे सुरूच होते. याचा गोविंद गायकवाडला राग आल्याने गेल्या काही दिवसांपासून योगेशला मारण्याचा ‘प्लॅन’ बनविला होता. 

Tags : ahmadnagar, jamkhed, double murder case,