Wed, Jan 16, 2019 17:54



होमपेज › Ahamadnagar › नगर : जामखेडमध्ये गोळीबारात दोघे ठार

नगर : जामखेडमध्ये गोळीबारात दोघे ठार

Published On: Apr 28 2018 10:50PM | Last Updated: Apr 28 2018 10:50PM



नगर: पुढारी ऑनलाईन

बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी सायंकाळी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादीच्या दोघांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोणी व का केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडले आहे. त्यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. 

मयतांमध्ये राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारी योगेश अंबादास राळेभात (वय ३०) व कार्यकर्ता राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात यांचा समावेश आहे. 

याबाबत माहिती अशी की, शनिवारी दोघे दुकानासमोर बसलेले असताना सायंकाळच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या़ त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेले.

गोळीबारानंतर ते दोघही एकाच जागेवरच पडून होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे दोन्ही रुग्ण उपचाराअभावी अर्धा तास पडून होते. जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नगरला आल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी दोघांनाही मयत घोषित केले.