Wed, Jan 16, 2019 09:13होमपेज › Ahamadnagar › तूर, हरभरा खरेदी केंद्रास मुदतवाढ द्या

तूर, हरभरा खरेदी केंद्रास मुदतवाढ द्या

Published On: May 18 2018 1:14AM | Last Updated: May 17 2018 10:41PMशेवगाव : प्रतिनिधी

तूर व हरभरा खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदार यांना दिला आहे.शेवगाव येथे बाजार समितीच्या आवारात नाफेडमार्फत  17 फेब्रुवारीपासून शासकीय दरात तूर खरेदी केंद्र चालू झाले. यात 2 हजार 863 शेतकर्‍यांनी तूर विक्रीसाठी केंद्रावर नोंदणी केली. त्यानुसार 15 मे पर्यंत 2 हजार 136 शेतकर्‍यांची 20 हजार 73 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ही खरेदी शासणाने बंद केली. खरेदी सुरू असणार्‍या कालावधीत गोदामाअभावी हे केंद्र पंधरा दिवस बंद होते. काही दिवस खरेदी कमी प्रमाणात करण्यात आली. परिणामी संपूर्ण तूर खरेदी होऊ शकली नाही. नोंदणी झालेल्या अनेक शेतकर्‍यांची तूर अद्याप घरात पडून असताना हे केंद्र बंद करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या नुकसानीचा आहे.

शेवगावसह पाथर्डी तालुक्यातील शेतकरी हमीभावामुळे या केंद्रावर तुरीची विक्री करण्यास धडपडत होता. खासगी व्यापारी आता मनमानी भाव देऊन त्यांची लूट करणार असल्याने उत्पन्नाचे मोठे नुकसान होणार आहे. कपाशीच्या बोंडअळी प्रमाणे तूर विक्रीचे संकट शेतकर्‍यांवर ओढले गेले आहे. हरबरा खरेदीची अशीच अवस्था झाली. शासनाने तूर व हरबरा खरेदी केंद्रास मुदतवाढ द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करील, असा इशारा पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, ख. वि. संघाचे चेअरमन विकास घोरतळे, बप्पासाहेब लांडे, भागवत गुरुजी आदींनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.