Thu, Jul 18, 2019 17:20होमपेज › Ahamadnagar › बदली झालेल्या शिक्षकांची होणार तपासणी

बदली झालेल्या शिक्षकांची होणार तपासणी

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बहुप्रतीक्षित ऑनलाईन बदल्या झाल्यानंतर आता बदली झालेल्या शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेली माहिती तपासण्यात येणार आहे. बदलीच्यावेळी ऑनलाईन माहिती चुकीची भरलेली असल्यास संबंधित शिक्षकाच्या दोन वेतनवाढी रोखण्यात येणार आहेत. तसेच पाच वर्षांसाठी त्याला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.

बदल्या झालेल्या शिक्षकांमध्ये सर्वाधिक संख्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांची आहे. मराठी माध्यमात एकुण 11 हजार 565 शिक्षक आहेत. त्यापैकी 7 हजार 347 शिक्षक बदलीस पात्र होते. त्यापैकी 5 हजार 413 शिक्षकांची बदली झाली. यात 4 हजार 786 उपाध्यापक, 499 पदवीधर व 128 मुख्याध्यापक आहेत. उर्दू माध्यमात एकुण 302 शिक्षक आहेत. त्यापैकी 204 शिक्षक बदलीस पात्र होते. यातील 120 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात 91 उपाध्यापक, 27 पदवीधर व 2 मुख्याध्यापक आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये सर्वाधिक शिक्षक अकोले तालुक्यातील आहेत.

बदलीच्या संवर्ग 2 मध्ये 30 किलो मीटरच्या बाहेर काम करणारे शिक्षक पती-पत्नी एकत्र आले आहेत. बदलीसाठी अर्ज भरतांना अनेक शिक्षक पती-पत्नींनी चुकीचे अंतर दाखविल्याचा शिक्षकांचाच आरोप आहे. त्याविरोधात काही शिक्षकांनी थेट एसटी महामंडळाकडूनच दोन ठिकाणांचे अंतर असलेली माहिती एकत्र केली आहे. शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीत अंतर चुकीचे दाखविले असल्यासही कारवाई होऊ शकते. 

ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या शिक्षकांची पुढील पाच वर्षे बदली होणार नसल्याचा शासन निर्णय आहे. त्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये किती शिक्षक येणार? याबाबत उत्सुकता आहे.