Wed, Jun 26, 2019 23:57होमपेज › Ahamadnagar › शिवसैनिकांकडून टोलनाक्याची तोडफोड

शिवसैनिकांकडून टोलनाक्याची तोडफोड

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:16AMसंगमनेर : प्रतिनिधी

एम. एच. 17 पासिंग असलेल्या सर्व चारचाकी वाहनांना टोलमुक्त करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने टोलनाका  व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्यानेे संतप्त शिवसैनिकांनी काल (दि. 23) खा. सदाशिव लोखंडे व उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर दोन तास आंदोलन  केले. या वेळी टोलनाक्याची तोडफोडही करण्यात आली.

शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे 18 एप्रिल रोजी घारगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी संगमनेरकडून घारगावकडे जाताना हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर तेथील नागरिक व शिवसैनिकांनी एम.एच.17 पासिंग असलेल्या वाहनांकडून सक्तीने टोलवसुली केली जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. स्थानिक नागरिकांनाही विना ओळखपत्र येथून सूट मिळत नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. सर्वांच्या समस्या समजून घेतल्यानंतर खेवरे यांनी टोलनाका व्यवस्थापनाला निवेदन देऊन 22 एप्रिलपर्यंत यावर निर्णय घ्यावा, अन्यथा 23 एप्रिल रोजी शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा दिला होता.

टोलनाका  व्यवस्थापनाला मुदत देऊनही टोलनाका त्यांनी ‘त्या’ निवेदनाला साधे उत्तरही न दिल्यामुळे संतप्त शेकडो शिवसैनिकांनी  काल पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर  हातात भगवे ध्वज घेऊन घोषणाबाजी करत घेराव घातला. टोलनाक्याच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्याचे अनुकरण केल्याने टोलनाक्यावरील विविध केबिनच्या काचा फोडल्या व आडवे रॉडही तोडले. 

यावेळी खा. सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख खेवरे यांनी टोलनाका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या वेळी उपजिल्हा प्रमुख दिलीप साळगट, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब केसेकर, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, श्रीरामपूरचे तालुकाप्रमुख  राजेंद्र देवकर, संगमनेर तालुका महिला आघाडी प्रमुख शीतल हासे, पं.स. सदस्य अशोक सातपुते यांच्यासह शहर व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

नाशिकच्या धर्तीवर एम.एच.17 पासिंगच्या सर्व वाहनांना टोलमाफी, स्थानिक नागरिकांनाच रोजगार, महामार्गावरील भुयारी मार्ग व सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करणे, साईडच्या गटारी व पथदिवे लावणे, पादचार्‍यांसाठी क्रॉसिंगपूल उभारणे, भाजीपाला व शेतीमाल घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, शहर पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे, तालुका निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते. याबाबत टोल कर्मचारी संजय लोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काच फोडणार्‍या अज्ञात व्यक्‍तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.