Tue, Nov 20, 2018 23:05



होमपेज › Ahamadnagar › कोपर्डी : तिघांना फाशीच

कोपर्डी : तिघांना फाशीच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





नगर : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील  अत्याचार व हत्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेल्या तीनही आरोपींना बुधवारी  फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ (30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (26, रा. पीरवस्ती, कोपर्डी) ही शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. एक वर्ष चार महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला. निकालाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सकाळी हा निकाल दिला. मुख्य आरोपी शिंदे याने बलात्कार करून खून केला होता. तर इतर दोन आरोपींनी शिंदे याने रचलेल्या कटात सहभागी होऊन त्याला प्रोत्साहन देऊन सहाय्य केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले होते. दोषी ठरविल्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हा गुन्हा कशा पद्धतीने दुमिर्र्ळ आहे, याबाबत निकम यांनी 13 मुद्दे न्यायालयात उपस्थित केले होते. 

 न्याय मिळाला, आता फासावर लटकवा...

पोलिस, सरकारी वकील अ‍ॅड. निकम, सरकार व तमाम राज्यातील जनतेच्या सहकार्यामुळे माझ्या छकुलीला आज न्याय मिळाला आहे. तीनही आरोपींना फाशी दिल्याने आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. आता त्या तिघांना लवकरात लवकर फासावर लटकविले पाहिजे. तीच आमची अपेक्षा आहे.
- पीडितेची आई


 बलात्कार्‍यांना जरब बसविणारा निर्णय

ग्रामीण भागातील शाळकरी मुलींची छेडछाड, शारीरिक अत्याचाराच्या घटना वाढू लागलेल्या आहेत. कोपर्डीच्या घटनेत न्यायालयाने मुख्य आरोपीसह कटातील सहभागींनाही फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यातून बलात्कार करणारे, त्यांना प्रोत्साहन देणार्‍यांना चांगलीच जरब बसणार आहे. कटातील सहभागींनाही फाशीची शिक्षा होण्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. या शिक्षेमुळे शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.