Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Ahamadnagar › आमदार संग्राम जगताप, कोतकरविरुद्ध पुरावे नाही

आमदार संग्राम जगताप, कोतकरविरुद्ध पुरावे नाही

Published On: Jul 18 2018 1:52AM | Last Updated: Jul 17 2018 10:14PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर या दोघांविरुद्ध अद्यापपर्यंत पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे संबंधिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, असे लेखी म्हणणे ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी काल (दि. 17) न्यायालयात सादर केले आहे.

केडगाव हत्याकांडात पोलिसांनी अटक केलेल्या 10 जणांपैकी 8 जणांविरुद्ध ‘सीआयडी’ने न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे. आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे दोघांचीही जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनल पाटील यांनी ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळ यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. 

जगताप व कोतकर या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र का सादर केले नाही, याबाबत 7 दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर मंगळवारी सपकाळ यांनी न्यायालयासमोर लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या तपासात आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर या दोघांविरुद्ध पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. चौकशीत पुरावे आढळल्यास दोषारोपपत्र पाठविण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत अटक करून दोषारोपपत्र दाखल केलेले आरोपी संदीप रायचंद गुंजाळ ऊर्फ डोळसे, भानुदास एकनाथ कोतकर, रवींद्र खोल्लम, महावीर मोकळे, संदीप गिर्‍हे, बाबासाहेब केदार, विशाल कोतकर, भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बी. एम. कोतकर या 8 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे. तसेच फरार असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, औदुंबर कोतकर व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी महापौर संदीप कोतकर या तिघांचा कटातील सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यांना अटक करून चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल.